11 August 2020

News Flash

बाजार-साप्ताहिकी : झंझावात

मेमध्ये महिन्द्रच्या ट्रॅक्टर्सची विक्री ही मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीपेक्षा जास्त झाली.

संग्रहित छायाचित्र

* सुधीर जोशी

मागच्या आठवडय़ात टाळेबंदी उठण्यापूर्वीच बाजाराने वरची दिशा पकडली होती. इंधन व विजेची वाढती मागणी, कोटक महिन्द्र बँकेच्या नवीन समभाग विक्रीला मिळालेला तिप्पट प्रतिसाद, चीनमधून धातूंची वाढणारी मागणी अशा संकेतांच्या आधारावर बाजाराने य आठवडय़ात वाटचाल केली. मुडीजने भारताच्या पतमानांकनात केलेल्या कपातीकडे बाजाराने दुर्लक्ष केले. गेल्या आठवडय़ाप्रमाणे याही आठवडय़ात सेन्सेक्स व निफ्टीत जवळजवळ सहा टक्क्यांची वाढ झाली आणि सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ३४,००० व १०,०००चा टप्पा पार केला.

मेमध्ये महिन्द्रच्या ट्रॅक्टर्सची विक्री ही मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीपेक्षा जास्त झाली. शेतीपूरक उत्पादनांना करोना टाळेबंदीतून सवलत होती. परंतु ग्रामीण भागातील मागणीतील जोर हा चांगला झालेला रब्बी हंगाम, मोसमी पावसाच्या समाधानकारक अंदाज व सरकारी धोरणांचा परिणाम आहे. टाळेबंदीनंतरच्या काळात वाहन विक्रीत विशेषत: दुचाकी व एसयूव्हीमध्ये होणाऱ्या संभाव्य वाढीचा हा संकेत आहे.

ब्रिटानियाच्या वार्षिक नफ्यात गेल्या तिमाहीत २७ टक्के  वाढ झाली. यंदाच्या एप्रिल व मे महिन्यातील विक्रीदेखील गेल्या वर्षांच्या तुलनेत २० ते २४ टक्क्यांनी जास्त आहे. करोनाच्या काळात आपल्या उत्पादनांत त्वरेने बदल करून स्वत:च्या वितरण व्यवस्थेमार्फत उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात कंपनी यशस्वी ठरली. कंपनीचा २० लाखांहून जास्त वितरकांशी थेट संपर्क आहे. हॉटेल व्यवसाय बंद असण्याचाही फायदा कंपनीला थोडय़ा प्रमाणात मिळतो आहे. कंपनीच्या समभागात थोडय़ा सबुरीने खरेदी करून एका यशस्वी कंपनीचा आपल्या पोर्टफोलियोमध्ये समावेश करता येईल.

श्वसनरोगांसंबधित औषधनिर्मितीमध्ये सिप्ला ही भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने अमेरिकेला आपली औषध उत्पादने निर्यात करते. सध्याच्या करोना संकटामुळे अमेरिकी अन्न व औषध प्राधिकरण हे कंपन्यांच्या औषध विक्री परवान्यांना तत्परतेने मान्यता देत आहे. रेमडेसिव्हिर या करोना रुग्णासाठीच्या औषधाच्या निर्मिती व वितरणासाठी सिप्लाला भारतीय औषध प्रशासनाने व जिलेड या कंपनीने परवानगी दिली आहे. कंपनीच्या समभागांमध्ये गेल्या दोन महिन्यांत बरीच वाढ झाली आहे. तरीदेखील संधी मिळताच या कंपनीमधील गुंतवणूक येत्या एक-दोन वर्षांत फायद्याची ठरेल.

सरकारी मालकीच्या स्टेट बँकेच्या समभागांमध्ये झालेली घसरण आता थांबेल. जून अखेरच्या तिमाहीचे निकाल बघून गुंतवणूक वाढवता येईल.

टाळेबंदी उठविण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार कार्यपद्धतीत बदल करणे, कच्चा माल पुरवठय़ाची साखळी पूर्वस्थितीत येणे व स्थलांतरित मजूर परत येणे अशी आव्हाने उद्योगांसमोर आहेत. बाजारात मात्र रोकड सुलभतेवर आधारित झंझावात सुरूच आहे. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, महिन्द्रा आणि महिन्द्रा, आयशर मोटर्स, हिरो मोटर्स, वेदांत, हिंडाल्को कंपन्यांचे वार्षिक निकाल अपेक्षित आहेत आणि त्याचा संबंधित कं पन्यांच्या समभाग मूल्यावर, भांडवली बाजारावरील परिणाम पाहाणे उत्सुकतेचे ठरेल.

sudhirjoshi23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2020 12:09 am

Web Title: sensex and nifty rose nearly six per cent during the week abn 97
Next Stories
1 टाळेबंदीकाळात कर्जावर व्याजमाफी
2 सलग सहा दिवसांची निर्देशांक दौड खंडित
3 निर्देशांक तेजीचा षटकार!
Just Now!
X