खंगलेल्या अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी प्रोत्साहनाचा सरकारकडून डोस पाजला जाईल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवली स्फुरण दिले जाईल, या आशेने सप्ताहारंभ भांडवली बाजारात सकारात्मक व्यवहार झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांत परिणामी सलग दुसऱ्या सत्रात वाढ नोंदविली गेली.

मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ ५९२.९७ अंशांची भर घालून सोमवारी बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा ३७,९८१.६३ या पातळीवर विसावला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने १७७.३० अंशांची झेप घेत ११,२२७.५५ या पातळीवर दिवसाच्या व्यवहारांना निरोप दिला. दोन्ही निर्देशांकांनी १.६० टक्क्यांच्या घरात मुसंडी मारली.

मुंबई शेअर बाजारातील सर्व उद्योग क्षेत्रनिहाय निर्देशांकांनी सोमवारच्या व्यवहारात वाढ नोंदविली. ऊर्जा, बँक, वाहन, स्थावर मालमत्ता, वित्तीय सेवा व धातू या निर्देशांकांनी साडेतीन टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी तर प्रमुख निर्देशांकांपेक्षा सरस २.६८ टक्क्यांची वाढ दर्शवून, सोमवारी भांडवली बाजारात सर्वव्यापी खरेदी सुरू असल्याचे दाखवून दिले.