सलग तिसऱ्या सत्रातील तेजीमुळे ‘सेन्सेक्स’ दोन आठवडय़ाच्या उच्चांकाला गुरुवारी पोहोचला. माहिती तंत्रज्ञानासह विशेषत: बांधकाम क्षेत्रातील समभागांची जोरदार खरेदी झाल्याने मुंबई निर्देशांक गुरुवारी १६०.९३ अंश वाढीने १९,४१३.५४ वर गेला. तर ‘निफ्टी’ ४४.७० अंशांची भर घालत ५,८६३.३० पर्यंत स्थिरावला.
या तिन्ही सत्रातील सकारात्मक कामगिरीमुळे ‘सेन्सेक्स’मध्ये ५३५.५८ अंशांची भर पडली आहे. सत्राची निराशाजनक सुरुवात करणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठय़ा हालचालींमुळे दिडशेहून अंशांच्या वाढीसह १९,५०० नजीक जाऊ शकला. त्यातही टीसीएसने १,५९०.४५ रुपये समभाग मू्ल्य मिळविताना ऐतिहासिक टप्पा गाठला. तर ३,००४.७५ रुपयांवरील इन्फोसिसचाही तब्बल वर्षभरानंतर नवा उच्चांक ठरला. विप्रो, एचसीएल टेकचेही समभाग मूल्या गेल्या ५२ आठवडय़ातील वरच्या स्तरावर होते. तर रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या आशेवर बांधकाम क्षेत्राचा आलेख आजही चढा राहिला.