News Flash

सेन्सेक्स घसरण सलग चौथ्या सत्रात कायम

निफ्टी निर्देशांक ८,१०० खाली, सहा महिन्यांच्या तळात

निफ्टी निर्देशांक ८,१०० खाली,  सहा महिन्यांच्या तळात

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गुरुवारी सलग चौथी निर्देशांक आपटी नोंदविली. ७१.०७ अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,२२७.६२ या गेल्या सहा महिन्यांच्या तळात विसावला. तर ३१.६५ अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ८,१०० चा स्तर सोडताना दिवसअखेर ८,०७९.९५ वर विराम घेतला.

चलन निश्चलनीकरणामुळे भांडवली बाजारात गेल्या चार सत्रांपासून पडझड सुरू आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यही ६८ नजीक घसरले आहे. परिणामी, गेल्या महिन्यात घाऊक तसेच किरकोळ महागाई दर कमी होऊनही बाजारात त्याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटली नाही.

मुंंबई शेअर बाजाराचे गुरुवारच्या सत्राचे व्यवहार २६,३०४.९० या वरच्या टप्प्यावर सुरू झाले. व्यवहारात सेन्सेक्स २६,४४९.८७ पर्यंत पोहोचला, मात्र दुपारनंतर त्यात उतार दिसू लागला. दिवसभरात २६,१५५.४० पर्यंत खाली आल्यानंतर त्यात बुधवारच्या तुलनेत ०.२७ टक्के घसरण झाली. त्याचा दिवसअखेरचा स्तर हा २५ मे रोजीच्या २५,८८१.०६ नजीकचा होता. निफ्टी सत्रातील प्रवास ८,१०० च्या खालीच राहिला. निफ्टी यापूर्वी, २६ मे रोजी ८,०६९.६५ या किमान स्तरावर होता.

दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, बँक क्षेत्रातील समभागांना गुरुवारी २.४५ टक्केपर्यंतच्या घसरणीला सामोरे जावे लागले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची वाढ चालू आर्थिक वर्षांत ८ ते १० टक्क्यांपर्यंतच राहण्याच्या नॅसकॉमच्या अंदाजानंतर सेन्सेक्समधील टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांचे समभागमूल्य २.२० टक्क्यांपर्यंत घसरले. तर ऊर्जा, पोलाद, तेल व वायू शुद्धीकरण, आरोग्यनिगा क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली.

सेन्सेक्समधील ३० पैकी १४ समभागांचे मूल्य रोडावले. त्यातही भारती एअरटेल, बजाज ऑटो, कोल इंडिया, एशियन पेंट्स, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी बँक, मारुती हे घसरणीत आघाडीवर राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.३८ व ०.५७ टक्क्याने घसरले. तेजी नोंदविलेल्या समभागांमध्ये टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, गेल, सिप्ला, एनटीपीसी, हिंदुस्थान यूनिलिव्हर राहिले.

आशियाई तसेच युरोपीय भांडवली बाजारात गुरुवारी संमिश्र चित्र राहिले. आशियातील चीन, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान येथील प्रमुख निर्देशांक एक टक्क्यापर्यंत घसरले. तर युरोपीय बाजारांची सुरुवात काहीशा वाढीने झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:48 am

Web Title: sensex at 6 month low nifty surrenders 8100 mark
Next Stories
1 हवाई क्षेत्रासाठी ‘कोलंबस’ दाखल
2 उत्पन्नातील अचानक वृद्धीही कर कचाटय़ात
3 मल्यांना कर्जमाफी नाही – जेटली
Just Now!
X