=भांडवली बाजारातील समभाग विक्रीचा दबाव बुधवारी अधिक विस्तारला. प्रमुख निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४००.३४ अंश घसरणीसह ५१,७०३.८३ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०४.५५ अंश घसरणीने १५,२०८.९० पर्यंत थांबला.

भांडवली बाजारातील वित्त, माहिती तंत्रज्ञान, बहुपयोगी वस्तू निर्देशांकातील समभागांची विक्री करून गुंतवणूकदारांनी बुधवारी नफावसुली धोरण अवलंबिले. वरच्या टप्प्यावरील समभाग मूल्यांमध्ये विक्री करण्याचा मोह गुंतवणूकदारांना बुधवारीही आवरता आला नाही.

सेन्सेक्समध्ये नेस्ले इंडिया सर्वाधिक, जवळपास ३ टक्क्य़ांनी घसरला. तसेच बजाज फिनसव्‍‌र्ह, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, डॉ. रेड्डीज्, एचडीएफसी लिमिटेडचे मूल्यही खाली आले. तर प्रमुख निर्देशांक घसरणीत एचडीएफसी समूहातील दोन प्रमुख कंपनी समभागांचा हिस्सा अधिक राहिला.

घसरणीच्या बाजारातही स्टेट बँक, पॉवरग्रिड, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रिज, बजाज ऑटो मात्र २.३९ टक्क्य़ांपर्यंत वाढले. किरकोळ गुंतवणूकदारांचे मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अर्ध्या टक्क्य़ापर्यंत वाढले.