मुंबई : जागतिक भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर मंगळवारपासून तेजी नोंदविणाऱ्या प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारीही मोठी भर पडली. जवळपास एक टक्का झेप घेत सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक पुन्हा तांत्रिकदृष्टय़ा कळीच्या स्तरांपुढे गेले.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३४९.७६ अंश भर पडल्याने सेन्सेक्स ४१,५०० च्या पुढे, ४१,५६५.९० पर्यंत पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९३.३० अंश वाढ होऊन निफ्टी १२ हजारांपुढे, १२,२०१.२० वर स्थिरावला. येथील भांडवली बाजारांनी सलग दुसरी निर्देशांक तेजी नोंदविली आहे.

सेन्सेक्समधील हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक महिंद्र बँक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, महिंद्र अँड महिंद्र, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आदी ५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर स्टेट बँक, इंडसइंड बँक, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड, एनटीपीसी आदी १.३४ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, पोलाद, वाहन आदी जवळपास २ टक्क्यांपर्यंत वाढले. तर ऊर्जा, स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू आदी एक टक्क्यापर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप मात्र जवळपास पाव टक्क्यापर्यंत घसरले.

चीनमधून प्रसारित झालेल्या करोना विषाणूंची लागण होणाऱ्या रुग्णांची व त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी होत असल्याचा दिलासा जागतिक बाजाराला मिळाला. त्याचीच प्रतिक्रिया येथेही उमटली.

बुधवारच्या भांडवली बाजार व्यवहार समाप्तीनंतर जाहीर झालेल्या जानेवारीतील महागाई दर व डिसेंबरमधील औद्योगिक उत्पादन दरावरील प्रतिक्रिया गुरुवारी उमटण्याची शक्यता आहे.