News Flash

निर्देशांकांची नव्या दमाने मुसंडी!

भांडवली बाजारात निर्देशांकांची पुन्हा वरच्या दिशेने घोडदौड सुरू झाल्याचे दिसून आले.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांकांतील तेजी आणि वित्तीय सेवा, औषधी निर्माण व माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना मिळालेल्या खरेदीच्या पाठबळाने गुरुवारी भांडवली बाजारात निर्देशांकांची पुन्हा वरच्या दिशेने घोडदौड सुरू झाल्याचे दिसून आले.

दोन दिवसांच्या घसरणरूपी विश्रांतीनंतर, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नव्या दमाने जोरदार मुसंडी घेतली. गुरुवारी बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स ३५८.८३ अंशांनी उसळून ५२,३००.४७ वर बंद झाला. त्याच बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही १०२.४० अंशांची भर घालून १५,७३७.७५ या पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांनी पाऊण टक्क्याच्या घरात झेप घेतली.

अमेरिकेतील चलनवाढीसंबंधाने आकडेवारी आणि युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या सुरू असलेल्या पतधोरणविषयक बैठकीबाबत सकारात्मक अंदाज बांधत आशियाई बाजारांमध्ये गुरुवारी उत्साही वातावरण दिसून आले. भारतीय प्रमाण वेळेनुसार, त्यानंतर खुल्या झालेल्या स्थानिक भांडवली बाजारांवर त्याचे चांगले प्रतिबिंब उमटताना दिसले. बाजारात झालेल्या उत्साही खरेदीमुळे सेन्सेक्समधील ३० पैकी २३ समभागांचे मूल्य वधारले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचे आर्थिक आघाडीवरील दुष्परिणाम हे पहिल्या तिमाहीपुरते सीमित राहतील. गतिमानतेने सुरू असलेल्या लसीकरणाने संभाव्य तिसऱ्या लाटेचे आघातही कमी केले जातील, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाने मासिक अहवालात केलेल्या दाव्याचे बाजारातील खरेदीदारांच्या उत्साहाला आणखी बळ मिळवून दिले.

निर्देशांकात वजनदार स्थान असलेल्या बजाज फायनान्स आणि बजाज फिनसव्‍‌र्ह या दोन समभागांसह, स्टेट बँक, इंडसइंड बँक, कोटक बँक अशा बँका-वित्तीय समभागांचा गुरुवारी बाजारात बोलबाला दिसून आला. डॉ. रेड्डीज, टेक महिंद्र, आयटीसी हे अन्य चांगली मूल्य वाढ साधलेले समभाग होते. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिड व स्मॉल कॅप समभागांच्या निर्देशांकात अनुक्रमे १.२६ टक्के आणि १.७३ टक्के अशी दमदार वाढ दिसून आली.

रुपयात सलग तिसरी घसरण

भारतीय चलन अर्थात रुपयाने आणखी नऊ पैशांच्या घसरणीने अमेरिकी डॉलरमागे ७३ ची पातळी गाठली. प्रति डॉलर ७३.०६ रुपयाच्या स्तरावर गुरुवारी आंतरबँक चलन व्यवहार थंडावले. सलग तिसऱ्या घसरणीत त्याचे विनिमय मूल्य २६ पैशांनी रोडावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 12:58 am

Web Title: sensex climbs 358 points nifty closes above 15700 zws 70
Next Stories
1 अन्य बँकांच्या एटीएमचा वापर ठरेल महागडा!
2 पालिकांच्या कंत्राटी कामगारांना ‘राज्य विमा योजनां’चे संरक्षण
3 उपाहारगृहांसाठी ऑक्टोबरपासून नवीन नियम
Just Now!
X