‘निफ्टी’कडून १५ हजारांचा स्तर काबीज

मुंबई : देशात सर्वत्र करोनाचा हाहाकार आणि मुंबईतील वादळाचे तांडव यापासून बेफिकीर भांडवली बाजारात सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांकाच्या घोडदौडीने ‘सेन्सेक्स’ने भावनिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण ५० हजारांची पातळी मंगळवारी पुन्हा काबीज केली, तर निफ्टी निर्देशांकाने १५ हजारांपल्याड, १५,१०८ या पातळीवर मजल मारली.

जगभरातील प्रमुख भांडवली बाजारातील सकारात्मक उत्साहाकडून प्रेरणा घेऊन, स्थानिक बाजारात मंगळवारचे तेजीमय व्यवहार थंडावले तेव्हा सेन्सेक्स ६१२.६० अंशांच्या कमाईसह (१.२४ टक्के) ५०,१९३.३३ या पातळीवर पोहोचला होता. निफ्टीनेही दौड कायम राखत, मंगळवारी आणखी १८४.९५ अंशांची भर घातली आणि १५,१०८.१० या पातळीवर दिवसाच्या व्यवहारांना निरोप दिला.

एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्स या वजनदार समभागांमध्ये झालेली खरेदी ही सेन्सेक्सच्या मुसंडीस मुख्य कारण ठरली. जवळपास सहा टक्क्यांची मूल्यझेप नोंदविणारा महिंद्र अँड महिंद्र हा निर्देशांकातील सर्वाधिक वाढ साधणारा समभाग ठरला. बजाज ऑटो, टायटन, पॉवरग्रिड या समभागांनी उत्तम वाढ साधली. त्याउलट भारती एअरटेल, आयटीसी, डॉ. रेड्डी आणि स्टेट बँक हे मंगळवारच्या व्यवहारातील घसरणीतील समभाग होते.

सोमवार आणि मंगळवार अशा सलग दोन सत्रांमध्ये सेन्सेक्सने तब्बल १,४६१ अंशांची म्हणजे तीन टक्क्यांहून अधिक मुसंडी मारली आहे.

बाजारातील आनंदाला  उधाण कशामुळे?

१) मागील १० दिवसांपासून देशस्तरावर दैनंदिन करोनाबाधित रुग्णवाढीचा आलेख घसरत चालला असून, दुसरी लाट ओसरू लागल्याचा हा बाजारासाठी सुखद संकेत ठरला आहे.

२) कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीचे आणि पर्यायाने २०२०-२१ या संपूर्ण आर्थिक वर्षांचे अपेक्षेपेक्षा चांगले आलेले वित्तीय निकाल बाजाराला उत्साही स्फुरण देणारे आहेत.

३) यंदा जसे भाकीत केले गेले आहे त्याप्रमाणे सामान्यापेक्षा सरस पर्जन्यमान राहिल्यास, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेल्या नुकसानाची वेगाने भरपाई होण्याची अपेक्षा आहे.

४) राज्यांना अधिक लशींच्या खरेदी आणि वापराला केंद्राने दिलेल्या मंजुरीने पुढील तीन-चार महिन्यांत लसीकरणाला गती मिळून, तिसऱ्या लाटेची शक्यता आणि पर्यायाने अर्थगतीला बाधा येण्याचा धोका निवळण्याची आशा आहे.

४) परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जरी एप्रिलमध्ये ९,६५९ कोटी रुपये आणि मेमध्ये (सोमवापर्यंत) ८,९०९ कोटी रुपयांची समभाग विक्री करून निर्गुतवणूक केली असली तर, देशी वित्तसंस्था आणि म्युच्युअल फंडांनी एप्रिलमध्ये ११,०८८ कोटी रुपयांची, तर मेमध्ये (सोमवापर्यंत) २,८३९ कोटी रुपयांच्या खरेदीतून योग्य संतुलन साधले आहे.

करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिसत असलेली घट, परिणामी अर्थचक्र लवकरात लवकर ताळ्यावर येऊन, अर्थव्यवस्थेच्या मंद़ावलेल्या गतीत सुधार आणि कंपन्यांच्या मिळकतीत वाढीच्या आशा गुंतवणूकदारांमध्ये बळावल्या आहेत.

’  विनोद मोदी, रिलायन्स सिक्युरिटीज

रुग्णसंख्येत वेगाने घसरण, कंपन्यांचे उत्तम तिमाही निकाल, आशियाई भांडवली बाजारातील अनुकूल सकारात्मकता हे घटक तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोंडी फोडून निर्देशांकांच्या मोठय़ा मुसंडीस कारणीभूत ठरले आहेत.

’  विनोद नायर, जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस