आठवडय़ाची अखेर करताना भांडवली बाजाराने शुक्रवारी घसरण नोंदविली. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांतील घसरणीने गेल्या दोन व्यवहारापासून तेजीवर आरूढ असलेले वातावरण काहीसे नरमले. ६१.७४ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,२३६.३० पर्यंत तर २४.०५ अंश घसरणीसह निफ्टी ८,५६४.६० वर स्थिरावला.
सार्वजनिक क्षेत्रातील भेल कंपनीच्या नफ्यातील तब्बल ८२ टक्क्यांच्या आपटीने बाजारात अधिकतर नाराजी व्यक्त केली गेली. त्याचबरोबर कमी पातळीवरच्या समभागांची खरेदी करण्याचे धोरण गुंतवणूकदारांनी विशेषत: औषध व बँक क्षेत्राची निवड करताना अवलंबिले. व्यवहारात निफ्टीने ८,५९५.९५ व ८,५५२.७० दरम्यान प्रवास केला.
सप्ताहातील शेवटच्या व्यवहाराची सुरुवात करताना बाजाराने २२६.२० अंश वाढीसह यापूर्वीच्या दोन व्यवहारातील तेजीची कास कायम ठेवली होती. सत्रात सेन्सेक्स २८,३३५.६७ पर्यंत उंचावला. मात्र व्यवहारादरम्यान घोषित झालेल्या आघाडीच्या कंपन्यांच्या वित्तीय निकालाद्वारे अपेक्षाभंग झाल्याने बाजारात विक्रीचा जोर वाढला. तो दिवसअखेर कायम राहिला. व्यवहारात मुंबई निर्देशांक २८,१९३.९३ पर्यंत खाली आला.
सेन्सेक्समधील भेलसह स्टेट बँक, कोल इंडिया, बजाज ऑटो, स्टेट बँक, एनटीपीसी, सिप्ला, टीसीएस, भारती एअरटेल यांचे समभाग मूल्य घसरले. मुंबई निर्देशांकातील १९ समभागांना घसरणीचा फटका बसला. त्याचबरोबर ऊर्जा, बँक, पोलाद, भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता आदी निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले. मुंबई निर्देशांकातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही अनुक्रमे ०.२४ व ०.१४ टक्क्यांनी घसरले.