बाजारातील दुसऱ्या सत्रातील तेजीला बुधवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तसेच उपभोग्य वस्तुनिर्मिती कंपनी समभागांच्या जोरदार खरेदीचे निमित्त ठरले. करोनाच्या नव्या विषाणूला सध्या विकसित होत असलेली लस परिणामकारक ठरण्याच्या आशेने वाढलेल्या जागतिक बाजाराला येथील प्रमुख निर्देशांकांनीही साथ दिली.

सेन्सेक्स आठवडय़ातील तिसऱ्या सत्रात ४३७.४९ अंशवाढीने ४६ हजाराच्या आणखी पुढे, ४६,४४४.१८ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३४.८० अंशवाढीमुळे १३,६०० च्या काठावर, १३,६०१.१० पर्यंत झेपावला. दोन्ही निर्देशांकांत मंगळवारइतकीच, प्रत्येकी जवळपास एक टक्के वाढ नोंदली गेली.

डॉलरच्या तुलनेत भक्कम होत असलेल्या रुपयामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मूल्य बुधवारी आणखी उंचावले. या क्षेत्रातील टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेससह प्रमुख कंपन्यांच्या समभागांना गुंतवणूकदारांकडून मागणी राहिली, तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही माहिती तंत्रज्ञान निर्देशांक अग्रणी होता. तो जवळपास ४ टक्क्यांपर्यंत वाढला.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या विषाणूवर मोडर्ना, अस्ट्राझेनेकासारख्या कंपन्या विकसित करत असलेली लस परिणामकारक ठरत असल्याच्या आशेने गुंतवणूकदारांना खरेदीला प्रोत्साहन मिळाले.