भांडवली बाजारातील परदेशी गुंतवणूकदार संस्थांचा निधीओघ सप्ताहअखेरच्या व्यवहारातही कायम राहिला. सलग सहाव्या विक्रम नोंदविणाऱ्या प्रमुख निर्देशांकांमध्ये सेन्सेक्स ४७ हजारानजीक पोहोचला. तर निफ्टीनेही नवा ऐतिहासिक टप्पा शुक्रवारी गाठला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारच्या तुलनेत ७०.३५ अंश वाढीसह ४६,९६०.६९ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९.८५ अंश वाढीसह १३,७६०.५५ पर्यंत झेपावला. दोन्ही प्रमुख निर्देशांक ०.१५ टक्क्य़ाने वाढले.

आठवडय़ाच्या शेवटच्या सत्राची सुरुवातच तेजीसह करताना मुंबई निर्देशांक प्रथमच ४७ हजारावर पोहोचला. सत्रात त्यातील वाढ गुरुवारच्या तुलनेत २५० अंशांपर्यंत नोंदली जात होती. दिवसअखेर गुंतवणूकदारांचा विक्री दबाव निर्माण झाला.

मात्र तरीही सत्राची अखेर दोन्ही निर्देशांकांनी तेजीसह केली. सेन्सेक्स व निफ्टी अनोख्या टप्प्यानजीक पोहोचतानाच विक्रमाच्या नव्या शिखरावर पोहोचले आहेत. भांडवली बाजाराची सप्ताह कामगिरीही उंचावणारी ठरली. सेन्सेक्स या दरम्यान ८६१.६८ अंश तर निफ्टी २४६.७० अंशांनी वाढला.

सेन्सेक्समध्ये इन्फोसिस, बजाज ऑटो, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, टायटन कंपनी, एशियन पेंट्स, टीसीएस आदींचे मूल्य २.६४ टक्क्य़ांपर्यंत वाढले. तर इंडसइंड बँक, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, बजाज फिनसव्‍‌र्ह, भारती एअरटेल ३.३० टक्क्य़ांपर्यंत घसरले.

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या आशादायी वित्तीय निष्कर्षांचे बाजारात सकारात्मक पडसाद उमटले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही हाच निर्देशांक तेजीत अव्वल ठरला. त्याचबरोबर ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्यनिगा निर्देशांक १.७० टक्क्य़ांपर्यंत वाढले. तर दूरसंचार, तेल व वायू, स्थावर मालमत्ता, ऊर्जा आदी घसरले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप ०.३५ टक्क्य़ांपर्यंत घसरले. जागतिक भांडवली बाजाराच्या निर्देशांकांमध्ये सप्ताहअखेर संमिश्र वातावरण राहिले.