व्याजदर कपातीच्या नव्या आशेची जोड मिळाल्याने भांडवली बाजाराने सप्ताहारंभीच मोठी निर्देशांक वाढ नोंदवित गेल्या पंधरवडय़ाचा उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४६.४९ अंश वाढीसह २५.८५६.७० वर पोहोचला. तर शुक्रवारच्या तुलनेत निफ्टी सोमवारी ८२.९५ अंश वाढीसह ७,८७२.२५ पर्यंत जाऊ शकला.
ऑगस्टमधील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराने शून्याखालील (-) ४.९५ टक्के असा नवा विक्रमी तळ नोंदविल्याचे जोरदार स्वागत सोमवारच्या व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच बाजारात झाले. गेल्या सप्ताहअखेर, शुक्रवारी जाहीर झालेल्या जुलैमधील समाधानकारक (४.२ टक्के) औद्योगिक उत्पादन दराची सकारात्मक छायाही यावेळी दिसून आली. परकी चलन विनिमय व्यासपीठावरही डॉलरच्या तुलनेत भक्कम होत असलेल्या रुपयाचा प्रभावही बाजारातील व्यवहारावर सोमवारी पडला.
हे सारे वातावरण रिझव्‍‌र्ह बँकेला येत्या पतधोरणात व्याजदर कपातीसाठी पुरेसे आहे, असे मानून गुंतवणूकदारांनी सोमवारी समभाग खरेदीचा सपाटा लावला. मुंबई शेअर बाजारात व्याजदराशी निगडित क्षेत्रीय निर्देशांक व समभागांमध्ये मागणी अनुभवली गेली.
सोमवारच्या तेजीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने पुन्हा एकदा ७,८०० चा टप्पा सहज पार केला. निफ्टीचा सोमवारचा प्रवास ७,८७९.९५ पर्यंत झेपावला होता. तर व्यवहारात त्याचा तळ ७,७६१.८५ पर्यंतचा राहू शकला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने व्यवहारात २५,८९१.७३ पर्यंत झेप घेतली. दिवसअखेरही तेजीसह बंद झालेला त्याचा स्तर हा ३१ ऑगस्टनंतरचा सर्वात वरचा राहिला. तर सोमवारच्या व्यवहारात तो केवळ २५,५३१.०७ पर्यंतच खाली आला.
सेन्सेक्सने गेल्या सलग दोन व्यवहारात शतकी (१०९.३७) अंश आपटी नोंदविली होती. तर सोमवारच्या व्यवहारअखेरही ७,९०० नजीक राहणाऱ्या निफ्टीनेही दोन आठवडय़ानंतरचा वरचा टप्पा राखला आहे.
सेन्सेक्समधील एनटीपीसी सर्वाधिक, ५ टक्के वाढीसह आघाडीवर राहिला. त्याचबरोबर अ‍ॅक्सिस बँक, विप्रो, गेल, स्टेट बँक हेही वधारले. सेन्सेक्समधील केवळ बजाज ऑटो व मारुती सुझुकी हे दोनच समभाग घसरणीच्या यादीत स्थिरावले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक सव्वा टक्क्य़ांपर्यंत वाढले होते.
बाजारातील मंगळवारचे व्यवहार आता ऑगस्टमधील किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दरावर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष आहे. याबाबतची आकडेवारी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.
पोलाद समभागांचे मूल्य उंचावले
ठराविक स्टील उत्पादनावरील मर्यादित कालावधीसाठीचे वाढीव शुल्क तूर्त स्थगित ठेवण्यात आल्याने पोलाद निर्देशांक हा मुंबई शेअर बाजाराच्या एकूण तेजीत अधिक चमकला. त्यातील वेदांता, टाटा स्टील, हिंदाल्को यांचे समभाग मूल्य ४ टक्क्य़ांपर्यंत वाढले. मालमत्ता क्षेत्रातील मंदीच्या पाश्र्वभूमीवर हा कंपन्यांना दिलासा आहे.