सेन्सेक्ससह निफ्टीत किरकोळ घसरण

चार प्रमुख क्षेत्रांमध्ये थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीच्या जोरावर वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या भांडवली बाजारात आठवडय़ाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात नफेखोरीचे चित्र दिसले. बँक, नागरी हवाई सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर मंगळवारी दबाव निर्माण होत एकूणच प्रमुख निर्देशांक किरकोळ घसरणीसह स्थिरावले.
५४.११ अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,८१२.७८ वर तर १८.६० अंश घसरणीसह निफ्टी ८,२१९.९० पर्यंत आला. सत्रात ८,२०० च्या काठावर पोहोचणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक व्यवहारात ८,२५७.२५ पर्यंत पोहोचत अखेर सोमवारच्या तुलनेत किरकोळ घसरण नोंदविणारा ठरला. डॉलरच्या तुलनेत अधिक खोलात जाणाऱ्या रुपयानेही बाजारातील घसरणीला साथ दिली. मंगळवारच्या घसरणीने गेल्या सलग दोन दिवसांच्या तेजीलाही पायबंद बसला. या दोन व्यवहारात सेन्सेक्स ३४१.४६ अंशांनी घसरला आहे. सोमवारी मूल्यतेजीवर स्वार झालेल्या नागरी हवाई क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये नफेखोरी होत संबंधित समभाग ३.२५ टक्क्य़ांपर्यंत घसरले.