मुंबई : भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सलग दुसऱ्या व्यवहारात त्यांच्या विक्रमी टप्प्यावर नव्याने विराजमान झाले. मुंबई निर्देशांकाने गुरुवारी शतकी निर्देशांक भर घालत सेन्सेक्सला ४१ हजारांच्या आणखी पुढे नेले. तर अर्धशतकी निर्देशांक वाढीने निफ्टी १२,१५० पर्यंत गेला.

भांडवली बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार झाले. प्रमुख निर्देशांकांचा शुक्रवारचा प्रवास जाहीर होणाऱ्या दुसऱ्या तिमाहीतील विकास दरावर प्रतिक्रिया देणारा असेल.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०९.५६ अंश वाढीने ४१,१३० पर्यंत झेपावला. मुंबई निर्देशांक व्यवहारात ४१,१६३.७९ पर्यंत पोहोचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५०.४५ अंश वाढीसह १२,१५१.१५ वर स्थिरावला.

भांडवली बाजाराच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी बुधवारीही इतिहासात प्रथमच नवे शिखर गाठले होते. तत्पूर्वी सप्ताहारंभीही सेन्सेक्स व निफ्टीने प्रथमच अनुक्रमे ४१ हजार व १२ हजारानजीकचा विक्रमी प्रवास नोंदविला होता.

गेल्या दोन सत्रांत मिळून मुंबई निर्देशांकाने ३०८.८७ अंश भर नोंदविली आहे.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक सर्वाधिक, २.६८ टक्क्यांनी वाढला. आयसीआयसीआय बँकही त्याच प्रमाणात वाढला. त्याचबरोबर येस बँक, टाटा स्टील, स्टेट बँक, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस आदीही वाढले. तर हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी लिमिटेड व एचडीएफसी बँक, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी हे मात्र एकूण मुंबई निर्देशांकाच्या तेजीत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, पोलाद, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू आदी ३.४९ टक्क्यांनी वाढले. तर वाहन निर्देशांक मात्र घसरता राहिला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्यापर्यंत वाढले.

गुंतवणूकदार १.८७ लाख कोटींनी श्रीमंत

सलग दोन व्यवहारांतील निर्देशांकातील तेजीमुळे ऐतिहासिक विक्रम नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.८७ लाख कोटी रुपयांनी भर पडली. देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवलही या परिणामी आता वाढून १५५.५७ कोटी रुपयांवर गेले आहे.