सलग पाच सत्रांमध्ये घसरण नोंदविणाऱ्या शेअर बाजाराने बुधवारी अखेर किरकोळ ३६.१४ अंशांची तेजी नोंदविली. २०१४ मध्ये प्रथमच वाढ नोंदविताना सेन्सेक्स २०,७२९.३८ वर पोहोचला. सोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १२.३५ अंश वधारणेसह ६,१७४.६० पर्यंत गेला.
२०१४ ची सुरुवात घसरणीने करणाऱ्या मुंबई निर्देशांकाने गेल्या पाच व्यवहारांत मिळून ४८५ अंशांचे नुकसान सोसले आहे. पहिल्या चार दिवसांतील एकूण घसरणीपुढे तर एकूण डिसेंबरमधील वाढही फिकी पडली होती. यामुळे सेन्सेक्स २१ हजारांच्याही खाली आला होता.
भांडवली बाजारातील बुधवारचे व्यवहार तेजीतच राहिले. सार्वजनिक उपक्रमातील, आरोग्य निगा, वाहन, पोलाद, तेल व वायू आदी क्षेत्रांतील समभागांना मागणी येत सेन्सेक्स दिवसभरात २०,७८६.४१ पर्यंत उंचावला. दिवसाचा त्याचा तळ २०,६८८.१८ पर्यंत राहिला.
रुपया सप्ताह उंचीवर
रुपया सलग दुसऱ्या दिवशी तेजी दाखविताना आठवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचला. बुधवारी डॉलरच्या तुलनेत तो २३ पैशांनी भक्कम होत ६२.०७ वर गेला. भांडवली बाजारातील सुस्थिती तर आयातदारांकडूनही डॉलरची विक्री झाली. ६२.२० अशा भक्कम पातळीवर सुरुवात करून दिवसभरात ६२.०७ या बंदच्या उच्चांक पातळीवर गेले. परिणामी, ०.३७ टक्के वधारणेने रुपया आता १ जानेवारीनंतरच्या सर्वोच्च स्थानावर गेला आहे.