सेन्सेक्स-निफ्टी १९ महिन्यांच्या खोलात

सप्ताहभर काही प्रमाणात घसरण राखणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी आठवडय़ाची अखेर करताना ती खूपच विस्तारली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तर एकाच व्यवहारात तब्बल ३१७.९३ अंशांनी कोसळत थेट २४,५०० च्याही खाली, २४,४५५.०४ पर्यंत येऊन ठेपला. तर ९९ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,४३७.८० वर राहिला. सत्रअखेर त्याने ७,५०० चा स्तरही सोडला. व्यवहारात गेल्या २९ महिन्यांच्या तळात आलेल्या रुपयाच्या चिंतेने मुंबई निर्देशांकालाही त्याच्या गेल्या १९ महिन्यांच्या खोलात आणून ठेवले. निफ्टी, सेन्सेक्सपेक्षा स्मॉल व मिड कॅपसारख्या निर्देशांकातील गटांगळी तुलनेत अधिक राहिली.

चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांकडून कंपन्यांद्वारे फारसे फायद्यात नसलेले निष्कर्ष जाहीर होत असलेले पाहून गुंतवणूकदारही समभाग विक्रीचा सपाटा लावत आहेत. त्यातच डॉलरच्या तुलनेतील तब्बल २९ महिन्यांतील तळाची रुपयाची वाढती गटांगळी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति पिंप ३० डॉलरच्याही खाली आलेले खनिज तेलाचे दर यांनी चिंता वाढविली.

महिन्यावर अर्थसंकल्प आला असताना चालू आर्थिक वर्षांत विकासावरील खर्च व अर्थसंकल्पीय खर्च यात संतुलन साधण्याबाबत सरकारने केलेल्या आश्वस्ततेचा काहीएक परिणाम बाजारावर दिसला नाही. परिणमी, दिवसातील मोठय़ा घसरणीबरोबरच प्रमुख निर्देशांकांनी साप्ताहिक स्तरावरही सुमार कामगिरी नोंदविली.

जागतिक बाजारातील घसरण आणि कच्चे तेल, रुपया यातील उतरंडही येथील प्रमुख निर्देशांकाच्या सप्ताहअखेरच्या मोठय़ा आपटीला कारणीभूत ठरली असल्याचे निरीक्षण हेम सिक्युरिटीजचे संचालक गौरव जैन यांनी नोंदविले आहे.

तिमाही नफ्यातील २२ टक्क्यांपर्यंतची वाढ राखूनही हिंदुस्थान यूनिलिव्हरचा समभाग व्यवहारअखेरही २.७० टक्क्यांपर्यंत घसरला. तर सेन्सेक्समध्ये गेलचे मूल्य सर्वाधिक, ६ टक्क्यांनी खाली आले. त्याचबरोबर एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एल अ‍ॅण्ड टी, एशियन पेंट्स हेही घसरले.

आशियाई बाजारात चीन, हाँगकाँगच्या अनुक्रमे शांघाय, हँग सेंग निर्देशांक १.५० टक्क्यांपर्यंत घसरते राहिले. तर युरोपातील फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन येथील प्रमुख निर्देशांकांनी सुरुवातीच्या व्यवहारात १.३० टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदविलेली आढळून आले.

मे २०१४च्या स्तरावर वळण

आठवडय़ात सेन्सेक्स ४७९.२९ अंशांनी घसरला आहे. तर निफ्टीत १६३.५५ अंश आपटी नोंदली गेली आहे. आधीच्या सप्ताहात दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ४.६८ व ४.५४ टक्क्यांनी घसरले होते. सप्ताहअखेरच्या व्यवहारातील सेन्सेक्समधील गुरुवारच्या तुलनेतील १.२८ टक्के घसरणीने मुंबई निर्देशांकाने ३० मे २०१४ मधील किमान टप्प्यानजीक प्रवास केला आहे. तर ७,५०० खालील निफ्टीने शुक्रवारच्या सत्रात ७,४२७.३० पर्यंत लोळण घेतली.

स्मॉल-मिड कॅपची भयाण गटांगळी

बाजारात सद्य घसरण इतकी भयाण व सर्वव्यापी आहे की, सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ पाच समभागांचे मूल्य वाढू शकले. यामध्ये रिलायन्स, इन्फोसिस, हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, डॉ. रेड्डीज यांचा क्रम राहिला. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे ३.१८ व २.६८ टक्क्यांपर्यंत असे तिपटीने घसरले. बाजारात एकूण घसरण करणारे समभाग २,२८८ तर वधारणारे समभाग अवघे ३९९ इतकेच होते.