मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने शुक्रवारी अखेर त्याच्या स्थापनेतील वरच्या टप्प्याला गाठलेच. एकाच व्यवहारातील ४४६.९० अंशवाढीमुळे मुंबई निर्देशांक प्रथमच ४५ हजारापुढे ४५,०७९.५५ वर झेपावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १२४.६५ अंशवाढीमुळे १३,२५८.५५ हा नवा टप्पा गाठला.

सेन्सेक्सने गुरुवार व्यवहारात ४५ हजाराला स्पर्श केला होता. शुक्रवार सत्रअखेर या टप्प्यावर स्थिरावणे त्याला शक्य झाले, तर निफ्टीने सलग दुसऱ्या सत्रात ऐतिहासिक उच्चांक गाठला. व्यवहारात १३,२८०.०५ पर्यंत उंचावला.

चालू सप्ताहात ९२९.८३ अंशांची कमाई मुंबई, तर २८९.६० अंशांची वाढ राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने नोंदविली. टक्केवारीत हे प्रमाण अनुक्रमे २.०१ व २.२३ टक्के राहिले. दरम्यान, गेल्या सलग दोन व्यवहारांपासून घसरणारा रुपया डॉलरच्या तुलनेत शुक्रवारी वाढला.

‘बर्गर किंग’ला राजेशाही प्रतिसाद!

भांडवली बाजारात सूचिबद्ध होण्यासाठी सज्ज बर्गर किंग इंडियाला शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल १५६.६५ पट प्रतिसाद मिळाला. कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या ७.४४ कोटी कोटी समभागांच्या तुलनेत १,१६६.९३ कोटी समभागांकरिता भरणा झाला. यामध्ये गुंतवणूकदार संस्थांचा ८६.६४ पट तर किरकोळ गुंतवणूकदारांचा ६८.१५ पट प्रतिसाद मिळाला.