प्रमुख निर्देशांकांची सप्ताहअखेर तिमाहीतील सर्वोत्तम नोंद

मुंबई : गेल्या तिमाहीपासून विविध देशांची आरोग्य व अर्थव्यवस्था ठप्प करणाऱ्या करोनावरील औषधाचे प्रत्यक्षात येणे नजीक येऊन ठेपल्याच्या आशेवर भांडवली बाजारांनी सप्ताहअखेर तेजी नोंदविली. यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सला ३६ हजार तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला १०,६००चा टप्पा पार करता आला.

दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारच्या तुलनेत अर्ध्या टक्क्याची वाढ नोंदविल्याने सेन्सेक्स व निफ्टी आता त्यांच्या गेल्या तिमाहीच्या वरच्या टप्प्यावर स्थिरावले आहेत. जागतिक बाजारातही शुक्रवारी तेजीचे वातावरण राहिले.

करोनावरील औषधाच्या मानवी चाचणीला नियामकांनी मंजुरी दिल्यानंतर विषाणूवर मात करणारे औषध येत्या काही महिन्यांमध्ये बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी येथील भांडवली बाजारात या वृत्ताचे स्वागत झाले.

आठवडाअखेर १७७.७२ अंश वाढ नोंदविणाऱ्या मुंबई निर्देशांकाने व्यवहारात ३६,११०.२१ पर्यंत मजल मारली होती. दिवसअखेर तो ३६ हजारांपुढे, ३६,०२१.४२ पर्यंत स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी गुरुवारच्या तुलनेत ५५.६५ अंश वाढीने १०,६०७.३५ वर पोहोचला. प्रमुख निर्देशांकांनी ६ मार्चनंतरचा सर्वोत्तम टप्पा या रूपात गाठला आहे.

या आठवडय़ात मुंबई निर्देशांकात ८५०.१५ अंश तर निफ्टीत २२४.३५ अंश भर पडली आहे.

शुक्रवारी, सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, बजाज ऑटो, टीसीएस, टायटन, एचसीएल टेक आदी तेजीच्या यादीत राहिले.  इंटेल कॅ पिटलच्या जिओ प्लॅटफॉम्र्समधील हिस्सा खरेदीने रिलायन्स दीड टक्क्यापर्यंत वाढला. तर इंडसइंड बँक, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्सचे मू्ल्य काही प्रमाणात घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, ऊर्जा, भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक वाढले. तर पोलाद, बँक, वित्त आदी क्षेत्रीय निर्देशांक घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅ प व स्मॉल कॅ प अर्ध्या टक्क्यापर्यंत वाढले.