मोठय़ा मुसंडीसह सुरुवात करीत, भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारी अनोख्या टप्प्यांपुढे मजल मारली. सलग सहाव्या सत्रात दौड कायम राखत सेन्सेक्सने भावनिकदृष्टय़ा महत्त्वाच्या ४०,००० अंशांच्या टप्प्यापुढे, तर निफ्टीने ११,८०० पुढे आगेकूच साधली.

अग्रणी माहिती-तंत्रज्ञान कंपनी टीसीएसने बुधवारी सायंकाळी जाहीर केलेल्या उत्साहदायी तिमाही कामगिरीने, अर्थव्यवस्थेसाठी वाईट दिवस सरल्याचे स्पष्ट संकेत दिले. तोच सकारात्मक धागा पकडत, गुरुवारी सेन्सेक्सने ४०० अंशांची झेप घेत व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभर तेजीचा उत्साह कायम राहिल्याने, बुधवारच्या तुलनेत ३०३.७२ अंशांची भर घालत सेन्सेक्स ४०,१८२.६७ या पातळीवर स्थिरावला. चालू वर्षांत २५ फेब्रुवारीला सेन्सेक्सने ४०,००० च्या पातळीला स्पर्श केला होता. त्याचबरोबर निफ्टी निर्देशांकाने ९५.७५ अंशांच्या कमाईसह ११,८३४.६० हा टप्पा दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा गाठला. निफ्टीचाही हा २६ फेब्रुवारी २०२० नंतरचा दिवसअखेर स्थिरावलेला सर्वोच्च स्तर आहे.

जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या निकालाच्या हंगामाची सुरुवात टीसीएसच्या अपेक्षेपेक्षा सरस कामगिरीने दमदार झाली आहे. समभाग पुनर्खरेदीच्या (बायबॅक) कंपनीने केलेल्या घोषणेने बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह वाढविला. अमेरिकेत अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या पॅकेजच्या घोषणेबाबत आशावादाने जागतिक बाजारातील तेजीने पूरक भूमिका निभावली. याच आशावादाने विदेशी गुंतवणूकदारांकडून स्थानिक बाजारात निरंतर खरेदीपूरक गुंतवणुकीचा सुरू असलेला ओघ सेन्सेक्स-निफ्टीच्या नवनव्या स्तरावर झेपेस कारणीभूत ठरत आहे.