भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांची विक्रमी कामगिरी सलग तिसऱ्या व्यवहारातही कायम राहिली आहे. सेन्सेक्सने बुधवारच्या व्यवहारात ४४ हजारांचा स्तर ओलांडला.

बुधवारच्या व्यवहारात ४४,२१५.४९ असा अभूतपूर्व उच्चांकी स्तर गाठून, सेन्सेक्सने  २२७.३४ अंश वाढ ४४,१८०.०५ वर दिवसाला निरोप दिला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीतही बुधवारी अर्ध्या टक्क्यांची भर पडली. निफ्टी ६४.०५ अंश वाढीने १३ हजारानजीक, १२,९३८.२५ पातळीवर पोहोचला.

निर्देशांकांनी सलग तिसऱ्या सत्रात विक्रमी टप्पा गाठला आहे. मुंबई निर्देशांकाने तर नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ातच ४२ हजार ते ४४ हजार असा उल्लेखनीय प्रवास नोंदविला आहे. आठ महिन्यांनंतर सार्वकालिक उच्चांकाला मागे त्याने सारले, मात्र सेन्सेक्सचा ४४ हजारांपर्यंतचा प्रवास तुलनेत काही दिवसांतच घडला आहे.

भांडवली बाजारात बँक, वित्तीय सेवा कंपन्यांच्या समभागांबरोबरच वाहन, अभियांत्रिकी क्षेत्रांतील सूचिबद्ध समभागांना गुंतवणूकदारांकडून मागणी राहिली. सेन्सेक्समध्ये महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र सर्वाधिक, जवळपास ११ टक्के वाढीसह तेजीच्या यादीत अग्रणी राहिला. समभागाने त्याचे वर्षांतील सर्वोच्च मूल्यही गाठले. त्याचबरोबर एल अ‍ॅण्ड टी, इंडसइंड बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, स्टेट बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, अ‍ॅक्सिस बँक वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक सव्वा टक्क्यापर्यंत वाढले. त्यामुळे एकंदर खरेदीचा उत्साह सर्वव्यापी राहिल्याचे दिसून आले.

रुपयाही भक्कम

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यदेखील सलग तिसऱ्या व्यवहारात उंचावले. परकीय चलन विनिमय मंचावर स्थानिक चलन एकाच व्यवहारात २७ पैशांनी वाढून ७४.१९ पर्यंत झेपावले. बुधवारी ७४.४९ या स्तरावर रुपयाचे व्यवहार सुरू झाले आणि सत्रात ७४.०९ पर्यंत पोहोचले. तर ७४.५२ हा त्याचा सत्रतळ राहिला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर एक टक्क्यांनी वाढून प्रति पिंप ४४ डॉलर पुढे गेले.