28 January 2021

News Flash

सेन्सेक्स ४९ हजार पार

सप्ताहारंभीच मुंबई निर्देशांकात ५०० अंश भर; निफ्टी १४,५०० नजीक

(संग्रहित छायाचित्र)

सलग दुसऱ्या सत्रात विक्रमी निर्देशांक टप्पा गाठताना मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी प्रथमच ४९ हजारांचा स्तरही ओलांडला. सप्ताहारंभीच्या व्यवहारात ४९,३०० वर मजल मारणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेरच्या जवळपास ५०० अंश वाढीमुळे पहिल्यांदाच ४९,२७० नजीक पोहोचला.

करोनाबाधितांच्या संख्येतील घसरण, कोविड-१९ प्रतिबंधित लशीचा चालू आठवडय़ात प्रत्यक्ष वापर या आश्वासक वातावरणात कंपन्यांच्या तिमाहीतील वाढीव नफ्याच्या अंदाजावर गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा कायम ठेवला आहे.

सोमवारअखेर ४८६.८१ अंश वाढीसह सेन्सेक्स ४९,२६९.३२ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकानेही आठवडय़ाच्या पहिल्या व्यवहारात विक्रम नोंदविला. १३७.५० अंश वाढीसह निफ्टी प्रथमच १४,५०० नजीक, १४,४८४.७५ पर्यंत स्थिरावला. दोन्ही निर्देशांकात जवळपास एक टक्का भर पडली.

सोमवारी निर्देशांकाला विक्रमी स्तरावर पोहोचविण्यात माहिती तंत्रज्ञान, वित्त तसेच वाहन क्षेत्रातील समभागांनी हातभार लावला. शुक्रवारी, डिसेंबर २०२० अखेरच्या ७.२ टक्के नफावाढीच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांने गुंतवणूकदारांमधील खरेदीबळ वाढले.

सेन्सेक्समध्ये याच क्षेत्रातील एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्र, टीसीएस तेजीच्या यादीत राहिले.

एचडीएफसी बँक व एचडीएफसी लिमिटेड, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, महिंद्र अँड महिंद्रही वाढले. तर बजाज फिनसव्‍‌र्ह, बजाज फायनान्स, रिलायन्स, लार्सन अँड टुब्रो, कोटक महिंद्र बँक, स्टेट बँकचे समभाग मूल्य मात्र जवळपास दोन टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अर्थातच माहिती तंत्रज्ञान आघाडीवर राहिला. तसेच वाहन, स्थावर मालमत्ता, दूरसंचार, आरोग्यनिगाही ३.६३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर पोलाद, ऊर्जा, भांडवली वस्तू, बँक निर्देशांक घसरले.

प्रमुख निर्देशांक वाढूनही मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप मात्र किरकोळ प्रमाणात घसरले.

टीसीएसचा व्यवहारात ऐतिहासिक  समभागमूल्य, बाजार भांडवलाला स्पर्श

तिसऱ्या तिमाहीतील वाढीव नफ्याच्या जोरावर सत्रात ऐतिहासिक समभाग मूल्याला स्पर्श करणाऱ्या टीसीएसने सप्ताहारंभीच्या व्यवहारात विक्रमी १२ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवल टप्प्याला स्पर्श केला. सत्रअखेर मात्र टीसीएसला बाजार भांडवलाबाबत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कंपनीचे बाजारमूल्य ११.९१ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले. तर रिलायन्सने आघाडी घेत सर्वोत्तम १२.२२ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवल टप्प्याला गाठले. विशेष म्हणजे सेन्सेक्समध्ये सत्रअखेर टीसीएसचे मूल्य वाढले. तर रिलायन्सचे समभाग मूल्य घसरले. सत्रात प्रति समभाग ३,२२४ रुपयांपर्यंत मजल मारणारा टीसीएस दिवसअखेर १.७५ टक्क्यांनी वाढून ३,१७५.०५ रुपयांवर स्थिरावला.

मुंबई निर्देशांकात दोन महिन्यात ७,००० अंशभर

मुंबई निर्देशांकात गेल्या दोन महिन्यांत ७,००० अंशांची भर पडली आहे. (या दरम्यान विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी एक लाख कोटी रुपयांचे भांडवल समभाग खरेदीच्या रूपात ओतले आहे.) मार्च २०२० मधील २६,००० या २०२० मधील तळातून बाहेर येत सेन्सेक्स आता त्या स्तरापासून दुपटीने पुढे आहे. महिन्याभरात सेन्सेक्स १६.५ टक्क्यांनी वाढला आहे. ४९,००० पासून २०० अंश दूर असतानाही सेन्सेक्सने गेल्या सप्ताहअखेर नव्या विक्रमाची नोंद केली होती.

मिड, स्मॉल कॅप निर्देशांकांची अव्वल कामगिरी

किरकोळ गुंतवणूकदारांच्या व्यवहार पसंतीच्या समभागांचा समावेश असलेल्या बीएसई मिड कॅपने जानेवारी २०१८ मधील सर्वोच्च स्तर सोमवारी ओलांडला. बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक याच कालावधीतील उच्चांकापासून हजार अंशांने दूर आहे. बीएसई५०० मधील ९७ टक्के कंपनी समभाग दोन महिन्यांत वेगाने मूल्यवाढ नोंदविणारे ठरले. पैकी ४०० हून समभागांनी दुहेरी अंकवाढ नोंदविली आहे. यातील सुझलॉन एनर्जी, वख्रांगी, टेन्ला प्लॅटफॉम्र्स आणि सेलचे मूल्य दुपटीने वाढले.

बाजार भांडवलही विक्रमी

विक्रमी निर्देशांक नोंद करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचे भांडवलही सोमवारी ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचले. बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सप्ताहाच्या पहिल्या सत्रअखेर १९६.५६ लाख कोटी रुपये झाले. सेन्सेक्सच्या विक्रमाप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचे भांडवल ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 12:15 am

Web Title: sensex crosses 49000 abn 97
Next Stories
1 सप्टेंबरपर्यंत बुडीत कर्जे दुपटीने वाढणार!
2 करोना-टाळेबंदीत नोटांचा अधिक वापर
3 पॉलिसी पुनरुज्जीवनाची ‘एलआयसी’कडून संधी
Just Now!
X