सेन्सेक्स ४९,५००; निफ्टी १४,५०० पुढे

मुंबई : भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांची विक्रम परंपरा सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. एकाच सत्रातील जवळपास अडीचशे अंशवाढीने मुंबई निर्देशांक ४९,५०० पार गेला. तर पाऊणशेहून अधिक अंश वाढीमुळे निफ्टीने मंगळवारी त्याचा १४,५०० टप्पा ओलांडला.

सोमवारच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४७.७९ अंश वाढीने ४९,५१७.११ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७८.७० अंश वाढीमुळे १४,५६३.४५ पर्यंत पोहोचला. सत्रात दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ४९,५६९.१४ व १४,५९०.६५ वर झेपावले होते.

भांडवली बाजारातील निर्देशांक तेजीसह ऐतिहासिक स्तर गाठण्याचा क्रम मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिला.

गेल्या सप्ताहअखेर तसेच चालू आठवडय़ाच्या पहिल्या सत्रातही सेन्सेक्स व निफ्टीने विक्रमी टप्पा नोंदविला होता. मंगळवारी त्यात आणखी भर पडत सर्वोच्च शिखरासह प्रमुख निर्देशांक त्यांच्या अनोख्या टप्प्यापुढे गेले.

गेल्या तीन व्यवहारांत मिळून मुंबई निर्देशांकात १,४२३.७९ तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात ४२६.१० अंश भर पडली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी व्यक्त केलेल्या देशातील बँकांच्या थकीत कर्जाबाबतची चिंता बाजारावर मंगळवारच्या सत्रात परिणाम करू शकली नाही.

कंपन्यांच्या चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांच्या वाढीव नफ्याबाबतची गुंतवणूकदारआशा बाजारात कायम आहे. विशेषत: विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून समभाग खरेदीचे धोरण बाजारात आहे.

मंगळवारी सेन्सेक्समधील ३० पैकी स्टेट बँक, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी आदींचे समभाग मूल्य ३.६५ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

एशियन पेंट्स, हिंदुस्थान यूनिलिव्हर, नेस्ले इंडिया, टायटन कंपनी, कोटक महिंद्र बँक, सन फार्मा यांच्या समभाग मूल्यावर जवळपास ४ टक्क्य़ांपर्यंतचा मूल्यदबाव राहिला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, स्थावर मालमत्ता, ऊर्जा, तेल व वायू, बहुपयोगी वस्तू, वाहन, वित्त जवळपास ३ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्यनिगा, भांडवली वस्तू निर्देशांक घसरले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी अर्ध्या टक्क्य़ापर्यंत वाढले.

बाजार भांडवलही ऐतिहासिक

प्रमुख निर्देशांकासह मुंबई शेअर बाजाराचाही विक्रम मंगळवारी कायम राहिला. ४९,५०० पुढे ऐतिहासिक वाटचाल करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल प्रथमच १९७.४६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

सेन्सेक्सचा १,००० अंश वाढीचा प्रवास कालावधी

४८,०००-४९,००० ५ दिवस

४७,०००-४८,००० ६ दिवस

४६,०००-४७,००० १३ दिवस

४५,०००-४६,००० ३ दिवस