अर्थसंकल्पाने भांडवली बाजाराला दिलेला जोम दोन आठवडय़ांनंतरही टिकून असून, त्याचाच परिणाम म्हणून ‘सेन्सेक्स’ या बाजाराच्या मुख्य निर्देशांकाने सोमवारी ५२,००० हा आणखी मैलाचा दगड इतिहासात पहिल्यांदाच पार केला. निफ्टी निर्देशांकही पहिल्यांदाच १५,३०० पल्याड बंद झाला.

देशाच्या अर्थव्यवस्थेविषयक अनुकूल संकेत आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून निरंतर सुरू राहिलेला खरेदीचा ओघ याच्या परिणामी भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. त्याचे प्रत्यंतर म्हणून सोमवारी सेन्सेक्सने त्याच्या घोडदौडीत आणखी ६०९.८३ अंशांची भर घातली आणि ५२,१५४.१३ अशा अभूतपूर्व स्तरावर दिवसाला निरोप दिला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने १५१.४० अंश कमावत १५,३१४.७० अशी विक्रमी पातळी दिवसअखेर नोंदविली. मुख्यत: बँका आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांनी सेन्सेक्सच्या उसळीत मोठे योगदान दिले. ५.८८ टक्के वाढलेला अ‍ॅक्सिस बँकेचा समभाग सेन्सेक्समधील सर्वाधिक वधारणारा समभाग ठरला. आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी, बजाज फिनसव्‍‌र्ह आणि एचडीएफसी बँक हे निर्देशांकातील मोठी कमाई करणारे समभाग ठरले.