राजकारणावरील अस्थिरतेच्या सावटाचा दणका

भांडवली बाजार निर्देशांकातील सलग चौथ्या सत्रातील घसरण सप्ताहअखेर मोठय़ा फरकाची ठरली. शुक्रवारच्या एकाच व्यवहारात सेन्सेक्स तब्बल ५१० अंशांनी घसरला. निर्देशांकाची ही ६ फेब्रुवारीनंतरची सर्वात मोठी सत्र आपटी ठरली.

चालू आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स ५०९.५४ अंशांनी खाली येत ३३,१७६ वर स्थिरावला. तर निफ्टीतील १६५ अंश आपटीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १०,१९५.१५ वर येऊन थांबला.

जागतिक भांडवली बाजारातील अस्वस्थता येथे सलग चौथ्या व्यवहारात नोंदली गेली. त्याचबरोबर तेलुगू देसम पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाने प्रमुख निर्देशांकातील घसरण सप्ताहअखेरच्या व्यवहारात विस्तारत गेली.  शुक्रवारच्या व्यवहारात मुंबई निर्देशांकाचा प्रवास ३३,११९.९२ ते ३३,६९१.३२ दरम्यान राहिला. तर सत्रअखेर १०,२०० चा स्तर सोडणारा निफ्टी व्यवहारादरम्यान १०,१८०.२५ पर्यंत खाली आला होता.

गेल्या सलग तीन व्यवहारांत मुंबई निर्देशांकातील घसरण २३२.४० अंश राहिली आहे. तर गुरुवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बाजारात ७०५.४० कोटी रुपयांचे समभाग विकले होते.

मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक शुक्रवारी घसरणीच्या यादीत होते. त्यातही तेल व वायू, पोलाद, ऊर्जा, सार्वजनिक उपक्रम, बँक आदी सर्वाधिक, २.३० टक्क्यांपर्यंत घसरले.

सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्स, एशियन पेंट्स हे जवळपास ४ टक्क्यांपर्यंत खाली आले. तर अदानी पोर्ट्स, हीरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, सन फार्मा, कोटक महिंद्र बँक, ओएनजीसी, एचजीएफसी लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो, डॉ. रेड्डीज्, आयटीसी, टाटा स्टील, मारुती सुझुकी, टीसीएस, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवरग्रिड, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक असे अधिकतर समभाग घसरणीच्या यादीत राहिले. महिंद्र अँड महिंद्र, विप्रो, हिंदुस्थान यूनिलिव्हर, येस बँक आदी एक टक्क्यापर्यंतच वाढ नोंदवू शकले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.०७ व १ टक्क्यापर्यंत घसरले.

आशियाई बाजारातील जपानचा निक्केई, हाँग काँगचा हँग सेंग, चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक अर्ध्या टक्क्यापर्यंत घसरण नोंदविली.

सलग तिसरा आठवडा नकारात्मक

साप्ताहिक तुलनेत सलग तिसरा आठवडा सेन्सेक्ससाठी घसरणीचा ठरला आहे. या आठवडय़ातील सेन्सेक्सची आपटी १३१.१४ अंश राहिली. तर या दरम्यान निफ्टी ३१.७० अंशांनी खाली आला आहे.

गुंतवणूकदारांना १.८६ लाख कोटींचा फटका

शुक्रवारच्या मोठय़ा निर्देशांक आपटीने मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता एकाच व्यवहारात तब्बल १.८६ लाख कोटी रुपयांनी घरंगळली. यामुळे मुंबई शेअर बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य घटून १४३ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले. मुंबई शेअर बाजारातील १०८ समभागांचे मूल्य हे त्यांच्या वर्षतळाला स्थिरावले. मुंबई शेअर बाजारातील १,८३५ समभाग घसरणीच्या तर ८५९ समभाग हे तेजीच्या यादीत राहिले. या स्थितीतही शुक्रवारी ३६ समभागांनी त्यांचा वार्षिक उच्चांक नोंदविला.