26 November 2020

News Flash

पडझडविस्तार!

मुंबई निर्देशांकाने यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी सत्रातील सर्वात मोठी निर्देशांक आपटी नोंदविली होती.

(संग्रहित छायाचित्र)

सेन्सेक्सची सात महिन्यांतील मोठी सत्रआपटी; 

मुंबई निर्देशांक दोन महिन्यांच्या तळात * वित्त कंपनी समभागांवर दबाव कायम * पाच दिवसांत ८.४८ लाख कोटींचे नुकसान * राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११ हजारांखाली

मुंबई : आयएल अ‍ॅण्ड एफएसमुळे बिगर बँकिंग वित्त कंपन्यांच्या घसरणीचा दबाव भांडवली बाजारात सप्ताहारंभीही कायम राहिला. शुक्रवारच्या मोठय़ा घसरणीनंतर नव्या आठवडय़ाच्या पहिल्या सत्रातही प्रमुख निर्देशांकात पडझड नोंदली गेली. सलग पाचव्या व्यवहारात आपटताना सेन्सेक्स सोमवारी ५३६.५८ अंशांनी खाली येत ३६,३०५.०२ वर स्थिरावला. गेल्या सात महिन्यातील सर्वात मोठी सत्रआपटी नोंदविणारा मुंबई निर्देशांक दोन महिन्यांच्या तळात विसावला.

१६९.२० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ११ हजाराचा स्तर सोडताना सोमवार सत्रअखेर १०,९७४.९० वर विराम घेतला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये दीड टक्क्य़ाहून अधिक अंशआपटी एकाच सत्रातील व्यवहारात अनुभवली गेली. गेल्या एकूण पाच व्यवहारातील ५ टक्के आपटीमुळे सेन्सेक्समध्ये या दरम्यान १,७८५.६२ अंश घसरण झाली आहे. तर देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता या कालावधीत ८.४८ लाख कोटींनी रोडावली आहे.

भांडवली बाजारातील सूचिबद्ध बँक, वित्त कंपन्यांच्या घसरणीबरोबरच आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवर भडकलेल्या इंधन दराचाही फटका सोमवारी जाणवला. परकीय चलन विनिमय मंचावर सत्रा दरम्यान डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या रुपयाचाही गुंतवणूकदारांच्या व्यवहार मानसिकतेवर परिणाम झाला. इंधन उत्पादक देशांमार्फत उत्पादन वाढविण्याची शंका तसेच चीनची अमेरिकेबरोबरच्या संभाव्य व्यापार चर्चेचेही सावट बाजारावर उमटले.

मुंबई निर्देशांकाने यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी सत्रातील सर्वात मोठी निर्देशांक आपटी नोंदविली होती. तर सोमवारअखेरचा सेन्सेक्सचा बंदस्तर हा ११ जुलैनंतरचा किमान  स्तर राहिला. सोमवार सत्रशेवटी बाजाराचे मूल्य १४७ लाख कोटी रुपयांवर स्थिरावले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बाजाराबाबत तर आयएल अँड एफएसबाबत केंद्रीय अर्थव्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी आश्वस्त केल्याचाही बाजारावर फारसा परिणाम दिसला नाही.

सेन्सेक्समधील तब्बल २४ कंपन्यांच्या समभागांचे मूल्य घसरले. त्यातही महिंद्र अँड महिंद्र हा तब्बल ६.४६ टक्के घसरणीसह मुंबई निर्देशांकात अव्वल राहिला. त्याचबरोबर मारुती सुझुकी, बजाज ऑटो, एचडीएफसी लिमिटेड, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक आदीही घसरले. चर्चेतील येस बँकेचा समभाग ०.३५ टक्क्य़ाने खाली आला. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरील र्निबधानंतर समभाग २९ टक्क्य़ांनी घसरला आहे.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थापर मालमत्ता निर्देशांक घसरणीत सुमार राहिला. तो तब्बल ५ टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात आपटला. तसेच वाहन, वित्त, दूरसंचार, आरोग्यनिगा, बँक, पायाभूत आदी क्षेत्रीय निर्देशांक जवळपास ४ टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर भक्कम डॉलरमुळे माहिती तंत्रज्ञान निर्देशांक तसेच या गटातील कंपनी समभागांचे मूल्य मात्र उंचावले. त्यात टीसीएस, इन्फोसिससारख्या कंपन्यांचा समावेश राहिला.

सोमवारी नागरी हवाई प्रवासी क्षेत्रातील कंपन्यांनाही घसरणफटका बसला. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप अनुक्रमे २.७२ व २.४० टक्क्य़ांनी खाली आले. मुंबई शेअर बाजारातील एकूण सूचिबद्ध कंपन्यांपैकी २,१११ कंपन्यांचे मूल्य घसरले. तर ४७० कंपन्यांच्या समभागांना त्यांचा वर्षभरातील मूल्यतळाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय शेअर बाजारात ५२ आठवडय़ांचा किमान स्तर नोंदविणाऱ्या कंपन्यांमध्ये ३०० समभागांचा समावेश राहिला.

रुपया अधिक भक्कम

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सप्ताहारंभीदेखील वाढते राहिले. अमेरिकी चलनाच्या समोर सोमवारी रुपया ४३ पैशांनी भक्कम होत ७२.६३ पर्यंत झेपावला. यापूर्वीच्या सलग दोन व्यवहारातही रुपयात वाढ नोंदली गेली आहे. शुक्रवारी तो १७ पैशांनी वाढला होता. तत्पूर्वी त्याने डॉलरसमोर ७३ पर्यंतची नांगी टाकली होती.

पडझडीस कारण की..

पायाभूत वित्त क्षेत्रातील आघाडीच्या आयएलअ‍ॅण्ड एफएस या कंपनीस मुदतपूर्ती झालेल्या रोख्यांची परतफेड करता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पतमापन संस्था इक्राने आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या रोख्यांची पत खाली आणली. म्युच्युअल फंडांच्या वेगवेळ्या योजनांनी आयएलअ‍ॅण्ड एफएसने विकलेल्या आणि इक्राने पत कमी केलेल्या रोख्यांपैकी २,८०० कोटी रुपयांचे रोख्यांमध्ये गुंतवणूक केली होती. परिणामी या रोख्यांच्या किंमती घसरल्याने गुंतवणुकीवर तोटा होऊ  लागला. या योजना लिक्विड आणि शॉर्ट टर्म फंडांच्या असल्याने यात तोटा होणे अपेक्षित नाही. मात्र हा तोटा होत असल्याने गुंतवणूकदारांनी या योजनांमधून आपला निधी हा नेहमीपेक्षा मोठय़ा प्रमाणावर काढून घेतला. गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशाची पूर्तता करण्यासाठी या योजनांनी गुंतविलेले रोखे विकणे गरजेचे होते.

आयएल अ‍ॅण्ड एफएसमध्ये गुंतवणूक असलेली आणि त्यामुळे गुंतवणूकदरांनी मोठय़ा प्रमाणावर पैसे काढून घेतलेले डीएसपी क्रेडिट रिस्क फंड ही एक योजना. या योजनेची गुंतवणूक डीएचएफएलमध्ये होती. निधी व्यवस्थापकांनी डीएचएफएलचे ९.१ टक्के व्याजाचे रोखे विकण्याचे ठरविले. या कंपनीच्या रोख्यांची मोठय़ा प्रमाणावर विक्री झाल्याने रोख्यांचा बाजारातील भाव कमी होत राहिला. या रोख्यांचा भाव इतका कमी झाला की रोख्यांचा परतावा परिणामी ११ टक्कय़ापर्यंत वाढला. आयएल अ‍ॅण्ड एफएसची पुनरावृत्ती डीएचएफएलमध्ये होण्याची अफवा भांडवली बाजारात वाऱ्याच्या वेगाने पसरली. या कंपनीला आपले दायित्व पूर्ण करता येत नसल्याने हा भाव वाढला असावा या अफवेने बाजार धास्तावला. या अफवेची झळ केवळ डीएचएफएललाच नव्हे तर भांडवली बाजारातील सूचिबद्ध बिगर बँकिंग वित्त कंपन्यांना – विशेषत: गृहवित्त पुरवठा कंपन्यांना बसला.

डीएचएफएलचा समभाग शुक्रवारी ६० टक्क्य़ांपर्यंत कोसळला होता. सोमवारी तो सत्रात ३७२ पर्यंत घसरल्यानंतर दिवसअखेर मात्र शुक्रवारच्या तुलनेत जवळपास १२ टक्क्यांपर्यंत वाढला. गेल्या सप्ताहअखेर आयएल अ‍ॅण्ड एफएसची झळ इंडियाबुल्स हौसिंग फायनांस, कॅनफिन होम, बजाज फायनांस, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनांस, महिद्रा फायनांस, एलआयसी हाऊसिंग फायनांस या अन्य बिगर बँकिंग वित्त कंपन्यांनाही बसली. अफवेचे निराकरण करताना डीएचएफएलची पाळता भुई थोडी झाली. डीएचएफएल किंवा घसरण झालेल्या कंपन्यांपैकी कोणीही आपल्या दायित्वाची पूर्तता करण्यात कसूर केली नसली तरी एका अफवेने लाखो गुंतवणूकदारांच्या लाखो कोटी रुपयांचा चुराडा केला. आयएल अ‍ॅण्ड एफएसला रोख्यांची परतफेड न करता आल्याचा फटका गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांना बसला आणि बाजारात गेल्या सप्ताहअखेरच्या व्यवहारात धरणीकंप झाला आणि अफवेचे निराकरण होताच बाजार सावरला. मात्र नव्या आठवडय़ाच्या प्रारंभी पुन्हा तीच धास्ती गुंतवणूकदारांच्या मनी उमटली.

आयएल अ‍ॅण्ड एफएसकडे एनएसईची विचारणा

आयएफ अँड एलएसकडून राष्ट्रीय शेअर बाजाराने सोमवारी स्पष्टीकरण मागितले. कंपनीतील मोठा हिस्सा जपानची कंपनी खरेदी करण्याबाबतचे वृत्त सोमवारी काही इंग्रजी वित्त माध्यमातून प्रसिद्ध झाले. त्याबाबत नेमकी सत्यता काय याची विचारणा बाजाराने कंपनीकडे केली आहे. तर डीएचएफएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांनी सोमवारी पुन्हा कंपनीच्या अर्थस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले. कंपनीचे कोणतेही अर्थदायित्व थकित नसल्याचे स्पष्ट करत गुंतवणूकदारांनी निश्चिंत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. हित बाब त्यांनी भांडवली बाजारालाही कळविली.

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..

एडेलविस फाय.                रु. २१६.७०            (-८.४३%)

इंडियाबुल्स हाऊ. फाय.     रु. ९८१.५०            (-७.५७%)

पीएनबी हाऊ. फाय.          रु.१,०८४.५०            (-७.५६%)

चोलामंडलम इन्व्हे.         रु. १,१७९.८५           (-७.१५%)

कॅन फिन होम्स               रु. २७१.७०            (-६.३९%)

गृह फायनान्स                रु. ३१७.७०            (-५.८८%)

मुथ्थूट फाय.                   रु. ४३१.६०            (-५.८४%)

जीआयसी हाऊ. फाय.      रु. २७५.५५            (-५.३६%)

रेप्को होम फाय.              रु. ४३१.६५            (-५.३०%)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2018 2:17 am

Web Title: sensex dives 536 points nifty breaches 11000
Next Stories
1 विलिनीकरणाला देना बँक संचालक मंडळाची मंजुरी
2 राणा कपूर यांचा उत्तराधिकारी आज जाहीर होणार
3 पाच दिवसांमध्ये शेअर बाजारात 8.47 लाख कोटी रुपयांची धुळधाण
Just Now!
X