दुसऱ्या लाटेतील करोनाबाधेचा भयकारक कहर आणि संपूर्ण टाळेबंदीच्या भीतीने भांडवली बाजारावर सोमवारी जबर घाव घातला. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या बेछूट समभाग विक्रीने मुख्य निर्देशांक सेन्सेक्स १,७०८ अंशांनी गडगडला, तर निफ्टी निर्देशांक १४,३५० अंशाच्या खाली ओसरला.

विषाणूजन्य साथीची दुसरी लाट ही अपेक्षा केली होती त्यापेक्षा अधिक घातकारक ठरत असून, टाळेबंदीसदृश निर्बंध लागू झाल्याने अर्थव्यवस्थेच्या पुनर्उभारीबाबत नव्याने कयास करणे भाग ठरत आहे. दुसरीकडे डॉलरच्या बदल्यात रुपयाच्या विनिमय मूल्यात अविरत सुरू असलेल्या पडझडीने भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांवर नकारात्मक प्रभाव पाडला.

देशाच्या कारखानदारीची परिस्थिती दर्शविणारी औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि किरकोळ महागाई दर अशा सायंकाळी उशिराने जाहीर होत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची आकडेवारीसंबंधाने बाजारात गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून आली.

गुंतवणूकदारांकडून चहूबाजूने झालेल्या विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्समध्ये १,७०७.९४ अंशांच्या (३.४४ टक्के) गटांगळीने तो ४७,८८३.३८ या पातळीवर रोडावला. चालू वर्षातील २६ फेब्रुवारीनंतरची सेन्सेक्समधील ही सर्वात मोठी आपटी आहे. त्याचबरोबरीने निफ्टी निर्देशांक ५२४.०५ अंश (३.५३ टक्के) घसरून १४,३१०.८० या पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. बीएसई मिड क्रॅप आणि बीएसई स्मॉल कॅप हे बाजाराचे व्यापक प्रतिनिधित्व असणाऱ्या निर्देशांकांमध्ये तर याहून मोठी ५.३२ टक्क्यांची घसरगुंडी दिसून आली.

बाजारात विक्रीवाल्यांचा रेटा इतका प्रचंड होता की, सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ डॉ. रेड्डीजचा समभाग वाढ नोंदवू शकला. समभाग मूल्यातील या जबर पडझडीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत ८.७७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुंबई शेअर बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल दिवसअखेरीस २००.८५ लाख कोटी रुपयांवर खाली आले.

अमेरिकी डॉलर आता  ७५ रुपयांपल्याड

मुंबई : करोनाच्या अधिक भयाण लाटेने अर्थव्यवस्थेपुढे उभ्या केलेल्या अनिश्चिततेच्या आव्हानाचा रुपयाच्या विनिमय मूल्यावर ताण येत असून, सोमवारी सलग सहाव्या भारतीय चलन अमेरिकी डॉलरपुढे गडगडताना दिसले. सोमवारच्या आणखी ३२ पैशांच्या ºहासाने डॉलरसाठी आता ७५.०५ रुपये मोजावे लागणार आहेत. नऊ महिन्यांपूर्वी मागे सोडलेल्या नीचांकाला रुपयाने पुन्हा गाठले आहे. भांडवली बाजारात करोना भयाने झालेल्या विक्रीने डॉलरची मागणी वाढल्याचा, रुपयाच्या मूल्यावर विपरीत परिणाम दिसला. रिझव्र्ह बँकेने अनपेक्षितपणे जाहीर केलेल्या रोखे खरेदीचे अति-तरलता सुलभ धोरण बुधवारी जाहीर केले आणि त्यानंतर सलगपणे रुपयाचे मूल्य १९३ पैशांनी- दोन टक्के घसरले आहे.