गुंतवणूकदारांच्या ५ लाख कोटींच्या मत्तेचा दोन दिवसांत घात

सेन्सेक्सची ८०६ अंशांनी घसरगुंडी; निफ्टीने १०,६०० चा मजबूत आधारही गमावला

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाचा नवा तळ आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या किमतीची येथील भांडवली बाजारातील भीती गुरुवारी अधिक गडद झाली. सलग दुसऱ्या दिवशी मोठी निर्देशांक आपटी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती या कालावधीत ५ लाख कोटी रुपयांनी कमी झाली. एकाच व्यवहारातील ८०० हून अधिक अंश आपटीने सेन्सेक्स गेल्या तीन महिन्यांच्या तळात स्थिरावला. दोन प्रमुख निर्देशांकातील घसरण सव्वा दोन टक्क्यांहून अधिक ठरली.

अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हने व्याज दरवाढीचे संकेत दिले असतानाच भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या शुक्रवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणात चढय़ा व्याजदराचा निर्णय घेतला जाण्याची धास्तीही भांडवली बाजारात तीव्रतेने उमटली.

मुंबई निर्देशांकातील बुधवारची ५५०.५१ अंश घसरण अधिक विस्तारताना सेन्सेक्स गुरुवारी सत्रअखेर ८०६.४७ अंश आपटीसह ३५,१६९.१६ वर स्थिरावला. तर निफ्टी २५९ अंश घसरणीने १०,५९९.३० पर्यंत थांबला.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या चार वर्षांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या खनिज तेलाच्या किमतींनी पिंपामागे ८६ डॉलरचाही आकडा पार केला आहे. तर यामुळे येथील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७४ च्याही खाली गेले आहे.

गुरुवारच्या मोठय़ा निर्देशांक आपटीच्या वातावरणात सेन्सेक्समधील केवळ सहा समभागांनाच मूल्यतेजी नोंदविता आली. उर्वरित २४ समभागांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य ७ टक्क्यांसह मुंबई निर्देशांकात आघाडीवर राहिले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकातील आपटीही जवळपास २ टक्क्यांपर्यंतची राहिली. मुंबई शेअर बाजारातूल ४०० कंपन्यांच्या समभागांनी त्यांचा ५२ आठवडय़ांचा मूल्यतळ गुरुवारच्या व्यवहारअखेर नोंदविला.

बुधवारच्या १.७१ लाख कोटी रुपयांच्या नुकसानानंतर मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आता १४० लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले आहे. अमेरिकी चलनात ते आता २ लाख कोटी डॉलरच्याही खाली आले आहे.

सेन्सेक्सच्या पाच मोठय़ा गटांगळ्या :

६ ८३४ अंश (सेन्सेक्स : १६,६३०) :             ११ फेब्रुवारी २००८

जागतिक वित्तीय अरिष्टाबाबत चिंतेतून व्यवहारात सेन्सेक्स १,००७ अंशांनी खाली आला होता.

* ८४० अंश (सेन्सेक्स : ३५,०६७) :             २ फेब्रुवारी २०१८

वर्षांतील निर्देशांकाची ही सर्वात मोठी सत्रआपटी.. भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर कठोर करविषयक नियम लागू करण्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा हा परिणाम होता.

* ८५५ अंश (सेन्सेक्स : २६,९८७) :             ६ जानेवारी २०१५

अर्थव्यवस्थेच्या अस्थिर स्थितीवर बाजारात उमटलेले हे प्रतिबिंब होते. व्यवहारातील २७,६९४ या वरच्या टप्प्यावरून माघार घेत सेन्सेक्स सत्रअखेर २६,९३७ या तळात विसावला होता.

* ८७० अंश (सेन्सेक्स : १४,०४३) :             ६ जुलै २००९

तत्कालीन यूपीए सरकारचा अर्थसंकल्पात विशेष आर्थिक सुधारणा नसल्याची नाराजी तब्बल ७ टक्के निर्देशांक घसरणीसह व्यक्त झाली. दिवसअखेर सुधार येऊनही मोठी निर्देशांक आपटी ठरली.

*  ८७५ अंश (सेन्सेक्स : १६,७३०) :           २२ जानेवारी २००८

जागतिक भांडवली बाजारातील अस्वस्थतेच्या सावटातून गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा केला. सेन्सेक्सने आदल्या दिवशीच्या सत्रातही मोठी घसरण अनुभवली होती.