News Flash

‘सेन्सेक्स’ची ८७० अंशांनी घसरगुंडी

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अर्थपरिणामांची धास्ती

(संग्रहित छायाचित्र)

देशभरात सर्वत्र करोनाच्या रुग्णसंख्येत सुरू असलेली विक्रमी वाढ आणि नुकतेच टाळेबंदीतून सावरत असलेल्या अर्थचक्राला पुन्हा कठोर निर्बंधांचा वेढा पडण्याच्या धास्तीने सोमवारी भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री करण्यात आली. दिवसारंभी तब्बल १,४४९ अंशांनी बाजाराचा मुख्य निर्देशांक उत्तरार्धात सावरला तरी ८७० अंशांच्या आपटी त्याने नोंदवली.

अनेक नकारात्मक बातम्यांचा एकदम झालेल्या माऱ्यावर बाजाराने दिलेली घायाळ प्रतिक्रिया म्हणून सोमवारच्या पडझडीकडे पाहता येईल. करोनाने अधिक भयकारक रूप घेऊन पुन्हा वर काढलेले डोके, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातील १८ पैशांचे मोठे नुकसान, त्यातच देशाच्या उत्पादन क्षेत्र आणि रोजगारांच्या दृष्टीने आगामी काळ आव्हानात्मक राहील असे सूचित करणारी ‘पीएमआय निर्देशांका’ची सात महिन्यांपूर्वीच्या नीचांकावर झालेली घसरण हे सर्व घटक गुंतवणूकदारांच्या चिंता वाढविणारे ठरले.

विशेषत: औद्योगिकदृष्ट्या देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी, तसेच शनिवारी-रविवारी संपूर्ण टाळेबंदी यांसारख्या निर्बंधांची रविवारी राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली. याच धर्तीचे उपाय आणि पुढे जाऊन आणखी कठोर निर्बंधांची देशात इतरत्रही अंमलबजावणी सुरू झाल्यास, अर्थव्यवस्थेच्या उभारीचा वेग मंदावण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये वाढली आहे. परिणामी वरच्या भावावर असणाऱ्या समभागांची विक्री करून नफा पदरी बांधून घेण्याचे धोरण त्यांनी अनुसरल्याचे दिसून आले.

सेन्सेक्सने सोमवारच्या व्यवहाराची अखेर ही ४९,१५९.३२ या पातळीवर म्हणजे गुरुवारच्या तुलनेत ८७०.५१ अंश खाली केली. बरोबरीने अधिक व्यापक असलेल्या निफ्टी निर्देशांक गुरुवारच्या तुलनेत २२९.५५ अंशांच्या घसरणीसह १४,६३७.८० या पातळीवर स्थिरावलेला दिसून आला.

बँका, वित्तीय समभागांना फटका

गुंतवणूकदारांच्या विक्रीचा सर्वाधिक फटका हा बँकांच्या तसेच वित्तीय समभागांना बसला. बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, बजाज ऑटो आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभाग मूल्यात परिणामी जबर नुकसान दिसून आले. त्याउलट या पडझडीतही घरून काम करण्याची पद्धत प्रभावीपणे अंगीकारणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांनी दमदार वाढ साधलेली दिसून आली. टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस, टेक महिंद्र आणि भारती एअरटेल हे समभाग दोन ते तीन टक्क्यांनी वधारले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:40 am

Web Title: sensex down 870 points abn 97
Next Stories
1 गृह कर्ज महागले
2 दुसऱ्या लाटेच्या मुकाबल्याची पुरेशी सज्जता – अर्थमंत्रालय
3 उत्पादन क्षेत्रासाठी आव्हानात्मक काळ;  मार्चमध्ये पुन्हा उतरती कळा!
Just Now!
X