आशियाई भांडवली बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातही शुक्रवारच्या व्यवहारात निर्देशांकाची जवळपास ४५० अंशांपर्यंतची पडझड अनुभवली गेली. दिवसअखेरही नकारात्मक प्रवास कायम राखणारा सेन्सेक्स २४१.७५ अंश घसरणीसह २७,३६६.०७ वर येऊन ठेपला. ‘मॅट’बाबतच्या शाह समितीच्या शिफारशींनी विदेशी गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न बाजाराची मोठी घसरण थांबविण्यास कारणीभूत ठरला. मात्र शुक्रवारचा मुंबई निर्देशांकाचा प्रवास हा १९ जूननंतरचा किमान स्तरावरील ठरला.
आठवडय़ातील शेवटच्या व्यवहारात ८,२२५ पर्यंत खाली आलेला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने शुक्रवारी त्याचा ८,३०० स्तरही सोडला. ७२.८० अंश घसरणीमुळे निफ्टी ८,२९९.९५ या ८,३००च्या आत विसावला. परकी चलन विनियम व्यासपीठावर रुपयाने ६५.९१ पर्यंतचा स्तर अनुभवल्यानेही बाजारात चिंता व्यक्त केली गेली. चीनमधील कमकुवत उद्योगनिर्मितीबाबतच्या आकडेवारीने जपान, हाँगकाँग, तैवान येथील प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण नोंदली गेली. आठवडय़ातील शेवटच्या व्यवहाराची सुरुवात २७,४४०.१० अशी घसरणीनेच करणारा मुंबई शेअर बाजार सत्रात थेट २७,१३१.४४ पर्यंत येऊन ठेपला. आशियाई भांडवली बाजार, डॉलरच्या तुलनेत रुपयातील कमकुवता आदी घटक त्यासाठी निमित्त ठरले. व्यवहारातील अखेरच्या टप्प्यात विदेशी गुंतवणूकदारांना दिलासा देणारा ए. पी. शाह समितीचा अहवाल सादर झाला. यानुसार या गुंतवणूकदारांवरील किमान पर्यायी कर (मॅट) हा एप्रिल २०१६ पासूनच लागू करण्याच्या आशेने बाजारातील मोठी घसरण काहीशी सावरली.
दिवसअखेरही घसरण नोंदविणाऱ्या सेन्सेक्समध्ये वेदांता सर्वाधिक, जवळपास ४ टक्के घसरणीसह थांबला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, वाहन, भांडवली वस्तू, बँक, ऊर्जा, तेल व वायू, पोलाद आदींमध्ये घसरण झाली. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स ७०१.२४ तर निप्टी २१८.६० अंश घसरण नोंदविणारे ठरले.