शेअर बाजारात थरकाप
भारतीय निर्देशांकांची आपटी; गुंतवणूकदारांना ७ लाख कोटींचा फटका
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
आशियातील सर्वात मोठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसरी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या आर्थिक मंदीच्या वणव्यात सोमवारी भारतीय भांडवली बाजार पुरता पोळून निघाला. आशियाई बाजारातील पडझडीचा जोरदार फटका मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराला बसला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ७ लाख कोटी रुपयांचा तोटा झाला. सत्रातील तिसरी तर गेल्या सात वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. भांडवली व परकी बाजारात चिंतेचे चित्र असताना केंद्रीय अर्थमंत्री तसेच रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर व सेबी अध्यक्षांनी मात्र जागतिक तुलनेत देशांतर्गत अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा विश्वास गुंतवणूकदारांना देण्याचा प्रयत्न केला.
सोमवार बंदअखेरची सेन्सेक्सची घसरण ही २१ जानेवारी २००८ रोजीच्या २,०६२ अंश आपटीनंतरची सर्वात मोठी ठरली. यामुळे सेन्सेक्स २६ हजाराखाली आला. शिवाय गुंतवणूकदारांच्या ७ लाख कोटी रुपयांचेही नुकसान झाले. तर बाजारात सूचिबद्ध ५०० हून अधिक कंपन्यांनी त्यांचा मूल्यतळ गाठला.
लेहमन ब्रदर्सच्या रूपात (२००८) अमेरिकेत उद्भवलेल्या आर्थिक मंदीच्या कालावधीतील भांडवली बाजारातील घसरण भारतीय निर्देशांकांनी पुन्हा एकदा अनुभवली आणि येथे काळ्या सोमवारची काजळी पसरली. बाजारातील ही धग डॉलरच्या तुलनेत रुपयाला ६७ पर्यंत नेण्यातही निमित्तमात्र ठरली.
चीनमध्ये काही दिवसांपासून आर्थिक मंदीचे सावट आहे. असे असतानाच सोमवारी तेथे १० टक्क्यांच्या रूपात प्रमुख निर्देशांकांनी २००७ चा स्तर गाठला. एकूणच आशियाई बाजारात याचे सावट सकाळच्या व्यवहारात उमटले असतानाच नव्या सप्ताहाची सुरुवात मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराने पडझडीने केली.

खनिज तेलात  कमालीचा उतार
जगभरातील प्रमुख भांडवली
बाजारात घसरण नोंदली जात असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या दराने सोमवारी कमालीचा उतार अनुभवला.
****
लंडनच्या बाजारात ब्रेन्ट क्रूडचे व्यवहार प्रति पिंप ४५ डॉलरच्याही खाली आले आहेत. तर इंधनसज्ज अमेरिकेतील तेल दराने ४० डॉलरखालील प्रवास नोंदवीत गेल्या साडेसहा वर्षांतील दरतळ गाठला. तेल दर आता अमेरिकेत २००८-०९ मध्ये उद्भवलेल्या जागतिक मंदी कालावधी समकक्ष पोहोचले आहेत.
****
सत्राच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स १,००० हून अधिक अंशाने खाली आला. दुपारच्या सत्रापर्यंत ही घसरण कायम राहिली. त्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत तब्बल १,६२४.५१ अंशाने खाली येत २५,७४१.५६ वर पोचला.
****
सेन्सेक्सला जवळपास ६ टक्क्यांच्या घसरणीची साथ देणारा निफ्टी शेवटी जवळपास ४९०.९५ अंशांच्या आपटीने ७,८०९ वर स्थिरावला.

भारताचा व्यापक आर्थिक पाया हा अन्य अनेक देशांच्या तुलनेत खूपच सुदृढ आहे. चलन बाजारात सध्या जागतिक स्तरावर उडालेला थरकाप हा दीर्घ काळापासून अटळ व अपरिहार्यच होता. चीनमधील ताजा घटनाक्रम ही त्याची शेवटची पायरी आहे.
-रघुराम राजन,  रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर

भांडवली बाजारात कितीही मोठी हालचाल नोंदली गेली तरी देशांतर्गत अर्थव्यवस्था भक्कमच आहे. सोमवारचा विपरीत परिणाम हा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सावट म्हणता येईल. त्यावर सेबी, रिझव्‍‌र्ह बँकेची नजर आहे.
– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

जगभरात निर्देशांक पडझड
* चीनच्या रूपातील आशियाई बाजारातील पडझडीचे सावट थेट युरोप, अमेरिकेपर्यंत पोहोचले असून आशियाई बाजारांनी सोमवारी १० टक्क्यांपर्यंतची आपटी नोंदविल्यानंतर विकसित देशांमधील प्रमुख निर्देशांकांनी सुरुवातीच्या सत्रात दुहेरी आकडय़ातील घसरण नोंदली.
* भारतीय भांडवली बाजाराच्या सोमवारच्या सुरुवातीपासून घसरण राखणाऱ्या शांघाय, हँग सँग आदी निर्देशांकांबरोबर या भागातील निर्देशांकांनी फेब्रुवारी २००७ चा तळ गाठला.
* भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारच्या सत्रात युरोपातील कॅक४०, एफटीएसई१०० निर्देशांकांमध्येही ५ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदली गेली. अमेरिकेतील डाऊ जोन्स, एस अ‍ॅन्ड पी ५००, नॅसडॅक यांच्यातही ३ टक्क्यांपर्यंतची घसरण होती.