अर्थसंकल्पातील संभाव्य तरतुदींबाबत सावधगिरी

मुंबई : येत्या काही दिवसांत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातील संभाव्य तरतुदींबाबत सावधगिरी बाळगताना भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी बुधवारी समभाग विक्रीचा सपाटा तिसऱ्या दिवशीही कायम ठेवला. परिणामी एकाच व्यवहारातील २०० हून अधिक अंश घसरणीने मुंबई निर्देशांक ४१,१०० वर येऊन ठेपताना त्याच्या गेल्या पाच आठवडय़ांतील तळात विसावला. निफ्टीतील बुधवारची घसरण ही सलग चौथ्या व्यवहारातील घसरण ठरली.

मंगळवारच्या तुलनेत सेन्सेक्स बुधवार सत्रअखेर २०८.४३ अंश घसरणीसह ४१,११५.३८ पर्यंत येऊन थांबला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ६२.९५ अंश घसरणीसह १२,१०६.९० वर स्थिरावला. मुंबई निर्देशांक यापूर्वी १६ डिसेंबर रोजी बुधवार बंद सत्राच्या समकक्ष होता. सोमवारच्या ‘हलवा’ मुहूर्ताने सुरू झालेल्या येत्या १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या तयारीनंतर गुंतवणूकदारांमध्ये आता त्यातील संभाव्य तरतुदींबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.

बुधवारच्या व्यवहारात ४१ हजारापर्यंतचा तळ अनुभवणाऱ्या सेन्सेक्समध्ये ओएनजीसी, एनटीपीसी, कोटक महिंद्र बँक, मारुती सुझुकी, एचडीएफसी लिमिटेड, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक यांचे मूल्य ५ टक्क्यांपर्यंत घसरले. तर नेस्ले इंडिया, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, स्टेट बँक, भारती एअरटेल आदी २ टक्क्यांपर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, तेल व वायू, वित्त, वाहन, ऊर्जा १.५७ टक्क्यांपर्यंत घसरले. तर माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार निर्देशांकात एक टक्क्यापर्यंत वाढ नोंदली गेली. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक ०.३२ टक्क्यापर्यंत घसरले.