निर्देशांक दोन महिन्यांच्या उच्चांकापासून माघारी

सप्ताहारंभ करणाऱ्या मुंबई निर्देशांकात सोमवारी शतकी घसरण नोंदली गेली. यामुळे सेन्सेक्स गेल्या दोन महिन्यांच्या उच्चांकापासूनही ढळला.
आशियाई बाजारातील तेजीच्या वातावरणातही स्थानिक पातळीवर सोमवारी गुंतवणूकदारांमध्ये निराशा राहिल्याने १०८.८५ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,३६१.९६ पर्यंत तर ३४.९० अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२६०.५५ पर्यंत खाली आला. गेल्या सप्ताहअखेर चीनने व्याजदरात कपात केल्याने आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांक नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना उंचावले होते. भारतात मात्र सेन्सेक्ससह निफ्टीतही सोमवारी घसरण नोंदली गेली. प्रमुख कंपन्यांच्या तिमाही निकालाच्या पाश्र्वभूमीवर येथील बाजारात दबाव निर्माण झाला. चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्यांमध्ये सोमवारी भारती एअरटेल, एचडीएफसी लिमिटेड या कंपन्या उल्लेखनीय होत्या. मंगळवारपासून सुरू होत असलेल्या अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मार्ग पत्करला.