सलग दुसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांमध्ये तेजी
विधानसभा निकालांच्या अंदाजावर प्रतिक्रिया नोंदवित भांडवली बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी तेजी नोंदविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १२०.३८ अंश वाढीने २५,७७३.६१ वर स्थिरावला. तर निफ्टीत ३० अंश भर पडून राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ७,८९०.७५ वर थांबला.
देशातील आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुडुच्चरी विधानसभेतील निकालाचे अंदाज सोमवारी बाजार व्यवहार संपुष्टात आल्यानंतर जाहीर झाले.
त्याचा परिणाम मंगळवारच्या बाजारातील व्यवहारावर अपेक्षित परिणाम झाला. अंदाज वर्तविताना विविध संस्था, वाहिन्यांनी पश्चिम बंगाल, केरळ तसेच आसाममध्ये भाजपाला दाखविलेले स्थान आश्चर्यकारक असल्याने बाजारानेही त्याची दखल घेतली, असे बाजार निरिक्षण मत बीएनपी पारिबास म्युच्युअल फंडचे श्रेयस देवळकर यांनी नोंदविले.
आसामध्ये भाजपाला बहुमत मिळण्याच्या अनोख्या निकाल अंदाजाने बाजारात गुंतवणूकदारांनी आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात जोरदार खरेदी केली. प्रत्यक्षात असे झाले तर राज्यात प्रथमच भाजपाचा शिरकाव होणार आहे.

त्याचबरोबर आशिया आणि युरोपीय बाजारातील तेजीचीही दखल बाजाराने घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर प्रति पिंप ५० डॉलरकडे प्रवास करत असल्याचे पाहून अनेक विदेशी बाजारांमध्ये तेजीचे वातावरण होते. येथे डॉलरच्या तुलनेत वधारलेल्या रुपयाचेही बाजारावर सकारात्मक परिणाम नोंदले गेले.
आठवडय़ातील पहिल्या सत्राच्या तेजीनंतर दुसऱ्या व्यवहाराची सुरुवात सेन्सेक्सने २५,७५६.१४ या वरच्या टप्प्यावरून केली. सत्रात तो २५,७३३.७६ किमान स्तरावरही आला. मात्र दिवसअखेर त्यात शतकाहून अधिक अंश वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने मंगळवारच्या व्यवहारात ७,९४०.१० पर्यंत मजल मारली. दिवसअखेर मात्र हा निर्देशांक ७,९०० च्या आतच स्थिरावला.
वाढत्या तेल दरामुळे विशेषत: सार्वजनिक तेल व वायू विपणन व विक्री कंपन्यांचे समभाग ३.६६ टक्क्य़ांपर्यंत उंचावले. तर बँक समभागांनीही आता घसरणीपासून उसंत घेतली आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी १९ समभागांचे मूल्य वाढले.
यामध्ये ओएनजीसी, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी लिमिटेड, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, गेल, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, टीसीएस यांचा समावेश राहिला.
एकूण तेजीच्या बाजारातही एनटीपीसी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स यांना समभाग मूल्य घसरणीला सामोरे जावे लागले.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.१९ व ०.१३ टक्क्य़ांनी वाढले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेल व वायू, स्थावर मालमत्ता, वाहन, भांडवली वस्तू, ग्राहकपयोगी वस्तू, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, बँक तसेच दूरसंचार निर्देशांक १.१८ टक्क्य़ांपर्यंत वाढ नोंदवित होते.

उल्लेखनीय समभाग मूल्य हालचाल :
सन टीव्ही : रु. ४३१.६५ (+९.७६%)
प्रवर्तक कलानिधी मारन यांच्या डीएमके-काँग्रेस आघाडीला तामिळनाडू विधानसभेत बहुमत मिळण्याच्या अंदाजानंतर.
पिरामल एंटरप्राईजेस : रु. १,३३५.९५ (+५.०५%)
जानेवारी ते मार्च २०१६ तिमाहीत नफ्यातील तब्बल ८९ टक्के वाढ राखल्यानंतर समभागाचा व्यवहारात वार्षिक मूल्य उंचाक.
टाटा कॉफी : रु. ८९ (-३.२६%)
टाटा समूहातील कंपनीने गेल्या तिमाहीत १२.५५ टक्के नफ्यातील घसरण नोंदविल्यानंतर.