07 June 2020

News Flash

‘फेड’ भयाचा वेढा : सेन्सेक्स घसरून २५ हजाराखाली

मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातील ही गेल्या आठ व्यवहारांतील सातवी घसरण ठरली.

सेन्सेक्स

चालू आठवडय़ात गुरुवारचा दिवस वगळता इतर सर्व व्यवहारांतील घसरणीचा क्रम भांडवली बाजाराने सप्ताहअखेरही कायम राखला. २०७.८९ अंश घसरणीने सेन्सेक्स २५,०४४.४३ वर पोहोचला. व्यवहारात २५ हजारांचा तळ सोडण्याचा अनुभव घेतल्यानंतरही मुंबई निर्देशांक दिवसअखेर त्याच्या तीन महिन्यांच्या नीचांकावर राहिला.
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सच्या महत्त्वाच्या टप्प्याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ७,६०० हा स्तर व्यवहारादरम्यान सोडला. सत्रात ७,५७५.३० पर्यंत घसरल्यानंतर निफ्टी दिवसअखेर काहीसा सावरला; मात्र गुरुवारच्या तुलनेत त्यात घसरणच नोंदली गेली. ७२.८५ अंश घसरणीसह निफ्टीने ७,६१०.४५ वर सप्ताहअखेर केली.
मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातील ही गेल्या आठ व्यवहारांतील सातवी घसरण ठरली. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स ५९३.६८, तर निफ्टी १७१.४५ अंशांनी खाली आला आहे. बाजार आता गेल्या दोन महिन्यांच्या नीचांकात स्थिरावला आहे. सलग दुसरी सप्ताह घसरण यंदा नोंदली गेली आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या आगामी संभाव्य दरवाढीच्या बैठकीबरोबरच येत्या आठवडय़ात येऊ घातलेल्या भारतातील औद्योगिक उत्पादन दर तसेच महागाईच्या आकडय़ावरही भांडवली बाजाराचा आगामी प्रवास अवलंबून असेल.
सप्ताहअखेरच्या व्यवहाराची सुरुवात करताना सेन्सेक्स ६१ अंशांनी घसरला होता. याच वेळी त्याने २५,२०० चा स्तर सोडला. व्यवहारात ही घसरण विस्तारत मुंबई निर्देशांकाला त्याच्या २५ हजारांच्या टप्प्यापासूनही फारकत घेणारी ठरली. दिवसअखेर काही प्रमाणात खरेदी झाल्याने पुन्हा २५ हजारांवरील टप्पा निर्देशांकाला गाठता आला. मात्र गुरुवारच्या तुलनेत त्यात घसरणच राहिली.
वाहनाबरोबरच बँक क्षेत्रातील समभागांचे मूल्य शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात घसरले. बँक निर्देशांक एकूण २.२५ टक्के घसरला.

दोन निर्णय, परस्परविरोधी पडसाद
वेगवेगळ्या दोन नियामकांच्या निर्णयाने शुक्रवारी दोन उद्योग क्षेत्रातील समभागात परस्परविरोधी पडसाद उमटले. राष्ट्रीय हरित लवादाने डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या नोंदणीस बंधने घातल्यानंतर वाहन उत्पादक कंपन्यांचे समभाग घसरले, तर भारतीय स्पर्धा आयोगाचा सिमेंट कंपन्यांवरील कोटय़वधींचा दंड स्पर्धा नियामकाने रद्द केल्याच्या घोषणेचे सिमेंट समभागांच्या मूल्यवाढीने स्वागत झाले.

वाहन (-)
टाटा मोटर्स रु. ३७७९५ (-२.९२%)
महिंद्र अँड महिंद्र रु. १,२६६.२० (-१.९२%)

सिमेंट (+)
जेके सिमेंट रु. ६५१.८५ (+१.०२%)
श्री सिमेंट्स रु. १०,७०५.०० (+०.७०%)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2015 5:11 am

Web Title: sensex ends 207 points lower nifty settles at 7610
Next Stories
1 सिमेंट कंपन्यांवरील कोटय़वधींचा दंड रद्दबातल
2 मल्याभोवती ‘सीबीआय’ चौकशीचा फास
3 आखातातील ‘जाफ्झा’मुक्त व्यापार क्षेत्रात
Just Now!
X