संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असताना शेअर बाजारातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकत मंगळवारी २,४७६ अंकांची वाढ झाली असून दिवअखेर निर्देशांक ३० हजार अंकाच्या पुढे बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ७०२ अंकांची वाढ झाली आहे. निफ्टी दिवसअखेर ८,७५० अंकांच्या पुढे बंद झाला. युरोपात करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये थोडी सुधारणा होत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारामध्ये दिसून आला. इंडस बँक, एचयूएल, महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये १०.८ टक्क्यांची वाढ नोंदवली. २४ औषधं आणि औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांच्या निर्यातीवरील निर्बंध मागे घेतल्याचाही औषध कंपन्यांच्या शेअर्सना फायदा झाला. करोना व्हायरसमुळे आर्थिक घडी पार विस्कटली आहे. मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अनेकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत शेअर बाजारातून बऱ्याच दिवसांनी दिलासा देणारी बातमी आली आहे.