सलग तिसऱ्या दिवशी निर्देशांकांची सरशी; ‘सेन्सेक्स’ची आणखी ३६४ अंशाची कमाई
सेन्सेक्सने गत तीन दिवसांत १,२४१ अंश अशी केलेली वाढ ही सप्टेंबर २०१३ नंतरची मोदी सरकारच्या कार्यकाळातील निर्देशांकाची सर्वोत्तम सलग कमाईची मालिका आहे
भांडवली बाजाराला अर्थसंकल्पापश्चात लाभलेली उभारी सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली असून, सेन्सेक्सने गुरुवारी आणखी ३६४ अंशांची कमाई करून २४,६०७ या महिन्यापूर्वीची उच्चांक पातळी पुन्हा गाठली.
भांडवली बाजारात तेजीवाल्यांना पुन्हा जोर चढल्याचा प्रत्यय वाढत्या मूल्यात्मक समभागांची खरेदीने गुरुवारी दिला. अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक रोजगार वाढीचे ताजे आकडे आणि खनिज तेल व धातूंच्या मागणी वधारल्याने सुधारलेल्या किमतींनी जगातील सर्वच प्रमुख बाजारातील उसळीचेही पडसाद स्थानिक बाजारात उमटले. वित्तीय शिस्तीबाबत सरकारकडून दिसलेल्या बांधिलकीने रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजाचे दर खाली आणले जातील, या अपेक्षेनेही बाजारात खरेदीचा जोर गेल्या तीन दिवसांत कमालीचा वाढला आहे. सेवा क्षेत्राचा वेग मंदावून तिमाही नीचांकाला पोहचल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला दर कपातीसारख्या उत्प्रेरकाची आवश्यकता वाढली असल्याचा सूर बळावला आहे. परिणामी सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी गेल्या तीन दिवसांत दमदार उसळी घेत महिन्यापूर्वीच्या उच्चांकाला पुन्हा गवसणी घातल्याचे चित्र दिसून येत आहे.