सलग तीन व्यवहारांतील नकारात्मक प्रवासादरम्यान झालेले नुकसान भांडवली बाजाराने गुरुवारी अमेरिकेच्या जोरावर भरून काढले. फेडरल रिझव्‍‌र्हने त्वरित व्याजदर वाढ न करण्याबाबत आश्वस्त केल्याने मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात तेजीचा उत्साह संचारला. एकाच व्यवहारातील मोठय़ा तेजीने प्रमुख निर्देशांक सप्ताहाच्या उच्चांकावर विराजमान झाला.
सुरुवातीपासूनच्या तेजीवर स्वार झालेला सेन्सेक्स व्यवहारात २६,६८८.७० पर्यंत झेपावला. व्यवहाराअखेर e01त्यात बुधवारच्या तुलनेत तब्बल ३९०.४९ अंश वाढ राहिली. यामुळे सेन्सेक्स २६,६३७.२८ वर गेला. गुरुवारच्या १.४९ टक्क्यांच्या तुलनेत १.८१ टक्के अशी निर्देशांक झेप सेन्सेक्सने यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी नोंदविली. गेल्या तीन सत्रांतील निर्देशांकाचे नुकसान जवळपास ४०० अंशांचे आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही गुरुवारी एकाच व्यवहारात ११७.८५ अंश वाढ नोंदवीत ७९०० चा टप्पा ओलांडत ७९६०.५५ पुढील प्रवास नोंदविला. व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया ६१ या पंधरवडय़ाच्या उच्चांकावर गेल्याने तसेच कच्च्या तेलाचे दोन वर्षांच्या नीचांकावर येत असलेले दर या घडामोडींनीही भांडवली बाजारातील तेजीत भर घातली.
भारतीय कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांबद्दल चिंता व्यक्त करत यापूर्वी सेन्सेक्सने गेल्या सलग तीन व्यवहारांत ३८३ अंश आपटी नोंदविली आहे. असे करताना मुंबई निर्देशांक २६३०० च्याही खाली आला होता. गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवात करतानाच सेन्सेक्स त्रिशतकी अंश वाढीने २६५०० च्या पुढे गेला. तर याच वेळी निफ्टीने ७९०० च्या पुढील प्रवास सुरू केला होता.
सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये गुरुवारी खरेदी झाली. व्याजदराशी निगडित स्थावर मालमत्ता, बँक हे निर्देशांक आघाडीवर राहिले; तर सेन्सेक्समधील २५ समभाग वधारले. त्यातील भेल, हिंदाल्कोसारख्या समभागाचे मूल्य ८.३७ टक्क्यांपर्यंत उंचावले. मिड व स्मॉल कॅममध्ये अनुक्रमे १.८३ व १.५९ टक्के वाढ दिसली.
१८ सप्टेंबरच्या ४८०.९२ अंश वाढीनंतरची सेन्सेक्सची गुरुवारची एकाच व्यवहारातील सर्वोत्तम झेप नोंदली गेली; तर २४ सप्टेंबरच्या २६७४४.६९ या टप्प्यानंतरचा मुंबई निर्देशांकाचा सर्वोत्तम टप्पा गुरुवारी नोंदविला गेला आहे. इन्फोसिसच्या शुक्रवारच्या दुसऱ्या तिमाही वित्तीय निष्कर्षांवर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी कंपनीचा समभाग ३.४ टक्क्यांनी उचलून धरला.