News Flash

निर्देशांक उसळीने सप्ताहअखेर

अर्थमंत्री-बँकप्रमुखांच्या बैठकीबाबत आशावाद

अर्थमंत्री-बँकप्रमुखांच्या बैठकीबाबत आशावाद

मुंबई : सलग तीन सत्रांतील घसरण सप्ताहअखेरच्या व्यवहारात थांबली. त्याचबरोबर मुंबई निर्देशांक थेट ४०० हून अधिक अंशांनी झेपावत ४१,६०० नजीक पोहोचला, तर जवळपास दोनशे अंशवाढीने निफ्टी १२,३०० च्या उंबरठय़ावर स्थिरावला.

शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४११.३८ अंशांनी झेपावत ४१,५७५.१४ वर बंद झाला, तर ११९.२५ अंशवाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२,२४५.८० पर्यंत पोहोचला. गुरुवारच्या तुलनेत दोन्ही प्रमुख निर्देशांकांतील वाढ ही एक टक्के प्रमाणातील ठरली.

चालू आठवडय़ात तीनही सत्रांत प्रमुख निर्देशांकांनी घसरण नोंदविली आहे, तर बुधवारी भांडवली बाजारात व्यवहार झाले नाहीत. शुक्रवारी मात्र एकूणच गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदीचे सत्र आरंभले. जागतिक भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर येथेही सप्ताहअखेरीस खरेदीचे वातावरण राहिले.

देशात आर्थिक मंदीसदृश वातावरण असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबरच्या सरकारी बँकप्रमुखांच्या शनिवारच्या भेटीत काही प्रोत्साहनपूरक निर्णय होण्याची आशाही बाजारात दिसून आली. बँकांच्या बुडीत कर्जाबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँक सर्वाधिक ३.३३ टक्क्यांसह वाढला. तसेच पॉवरग्रिड, स्टेट बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी यांचेही मूल्य वाढले, तर कोटक महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन कंपनी, टीसीएस यांचे मूल्य अर्ध्या टक्क्यापर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, स्थावर मालमत्ता, तेल व वायू, वाहन आदी निर्देशांक जवळपास पावणेदोन टक्क्यांपर्यंत वाढले, तर शनिवारच्या दिल्लीतील अर्थमंत्री-सरकारी बँकप्रमुखांच्या बैठकीमुळे बँक व वित्त क्षेत्रातील समभागांनाही मागणी राहिली. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक ०.८७ टक्क्यापर्यंत वाढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 2:23 am

Web Title: sensex ends 400 points higher nifty closes at 12250 zws 70
Next Stories
1 बाजार-साप्ताहिकी : नववर्षांच्या स्वागताची तयारी
2 पंतप्रधान वय वंदन योजनेत गुंतवणुकीसाठी ‘आधार’ सक्तीचे!
3 लांबलेल्या पावसाला कोल इंडियाचेही दूषण
Just Now!
X