घसरणीला लगाम बसून बाजाराला अखेर हायसे

मुंबई : गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी स्टेट बँकेने दाखविलेला पुढाकार बुधवारी भांडवली बाजाराच्या पथ्यावर पडला. बँकांबरोबरच वाहन क्षेत्रातील कंपन्यांना मूल्यात्मक खरेदी साथ लाभल्याने निर्देशांकांनी तेजी नोंदविली. डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या भक्कमतेचेही सेन्सेक्ससह निफ्टीने स्वागत केले.

मंगळवारच्या १७५ अंश घसरणीनंतर ३४,५०० नजीकच्या टप्प्याने बुधवारच्या व्यवहाराची सुरुवात करणारा सेन्सेक्स बुधवारच्या सत्रात ३४,८५८.३५ पर्यंत झेपावला. दिवसअखेर  ४६१.४२ अंश मुसंडीने ३४,७६०.८९ वर विसावला. तर  १०,५००च्या उच्चांक गाठल्यानंतर निफ्टी १५९.०५ अंश भर टाकत १०,४६०.१० पातळीवर स्थिरावला.

आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या कर्ज हप्ते थकीतानंतर भांडवली बाजारात समभागमूल्य आपटी नोंदविणाऱ्या गैर बँकिंग वित्त कंपन्यांच्या ४५,००० कोटी रुपयांच्या कर्ज मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय स्टेट बँकेने जाहीर केला आहे. त्याचे स्वागत भांडवली बाजारात बुधवारी झाले.

सूचिबद्ध  गैर बँकिंग तसेच गृह वित्त कंपन्यांचे समभागमूल्य १६ टक्क्यांपर्यंत झेपावले. भांडवली बाजाराच्या व्यवहार कालावधीत परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरचे मूल्य बुधवारी ७४ वर विसावले होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दरही प्रति पिंप ८५ डॉलरच्या आत स्थिरावले होते.

सेन्सेक्समध्ये मारुती सुझुकी, टाटा स्टील, येस बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, वेदांता, कोटक महिंद्र बँक, अदानी पोर्ट्स, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, टाटा स्टील, ओएनजीसी, बजाज ऑटो, एचडीएफसी, एनटीपीसी, यांचेही मूल्य वाढले.

हवाई इंधनावरील उत्पादन शुल्कातील संभाव्य कपातीमुळे या क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग ८ टक्क्यांपर्यंत वाढले. तर चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत जवळपास ५० टक्के निव्वळ नफ्यातील वाढ नोंदविणाऱ्या खासगी क्षेत्रातील बंधन बँकेचा समभाग ५.६० टक्क्यांनी वाढला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता सर्वाधिक, ४.४४ टक्क्यांसह आघाडीवर राहिला. त्याचबरोबर ग्राहकोपयोगी वस्तू, बँक, भांडवली वस्तू, सार्वजनिक उपक्रम, पायाभूत, वाहन, ऊर्जा, पोलाद, आरोग्य निगा, तेल व वायू आदी निर्देशांक जवळपास चार टक्क्यांपर्यंत वाढले.

२.३८ टक्क्यांसह घसरलेल्या समभाग मूल्यांमध्ये इन्फोसिस, टीसीएस, सन फार्मा, विप्रो, कोल इंडिया तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाचा समावेश राहिला.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटींची भर

*  गेले काही दिवस सुरू राहिलेल्या पडझडसत्राला, बुधवारी मोठय़ा निर्देशांक तेजीसह मोडून काढणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता एकाच व्यवहारात तब्बल ३ लाख कोटी रुपयांनी वाढली. मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध एकूण कंपन्यांचे बाजार भांडवल १३८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. उल्लेखनीय म्हणजे मुंबई शेअर बाजारातील बुधवारची उभारी ही सार्वत्रिक स्वरूपाची होती. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीतील वाढ  ही दीड टक्क्य़ांपर्यंत होती, त्या उलट मिड कॅप ४.७० टक्क्यांनी तर स्मॉल कॅप ३.९४ टक्क्यांनी वाढले.

रुपयाचे मूल्य १८ पैसे भक्कम

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे विनिमय मूल्य अखेर त्याच्या ऐतिहासिक तळाहून बुधवारी वर आले. स्थानिक चलन परकीय चलन विनिमय मंचावर १८ पैशांनी भक्कम होत ७४.२१ पर्यंत वधारले. चलनाचा बुधवारचा प्रवास ७४.१८ ते ७४.०५ असा वरचा होता.

रुपया गेल्या आठवडय़ाहून अधिक कालावधीपासून रोडावत आहे. या दरम्यान त्याने १९१ पैशांची आपटी नोंदविली. रुपयाने मंगळवारी ३३ पैशांच्या आपटीसह ७४.३९ हा ऐतिहासिक नीचांक नोंदविला होता.

सोमवारीही रुपया ३० पैशांनी आपटत ७४.०६ या तळाला प्रथमच पोहोचला होता. शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण बैठक उरकल्यापासून  रुपयाचे मूल्य तब्बल ८६ पैसे गडगडले आहे.