अमेरिकेतील अर्थउभारीच्या उपाययोजना माघारी घेण्याच्या शक्यतेला भांडवली बाजारात बुधवारी भारतीय रिझव्र्ह बँकेच्या संभाव्य व्याजदराच्या भीतीची जोड मिळाली. सलग सातव्या व्यवहारात मुंबई निर्देशांक घसरताना आता २०,२०० वर येऊन ठेपला आहे. ८७.५१ अंश घसरणीसह सेन्सेक्स २०,१९४.४० पर्यंत दिवसअखेर स्थिरावला. निफ्टीदेखील २८.४५ अंश आपटीने ६ हजारांच्या खाली येत ५,९८९.६० वर विसावला आहे.
मंगळवारी शेअर बाजाराचे व्यवहार संपल्यानंतर वधारत्या औद्योगिक उत्पादनाबरोबरच दुहेरी आकडय़ात पोहोचलेल्या किरकोळ महागाईचे आकडेही जाहीर झाले. परिणामी रिझव्र्ह बँकेकडून आणखी एक व्याजदर वाढीचा वार येण्याची भीती बाजारात व्यक्त केली गेली. मध्यवर्ती बँकेचे आगामी मध्य तिमाही पतधोरण १८ डिसेंबरला आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी यापूर्वी सलग दोन वेळा प्रत्येकी पाव टक्क्याची रेपो दरवाढ करण्यात आली आहे.
नव्या संवत्सराची विक्रमी टप्प्यापासून सुरुवात करणाऱ्या शेअर बाजाराने सलग सातव्या व्यवहारात घसरण नोंदविली आहे. यातून १,०४४.९६ अंशांच्या नुकसानीसह सेन्सेक्सने महिन्याचा नवा नीचांक दाखविला. बाजार यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी या पातळीवर होता. यापूर्वी २ ऑगस्टपर्यंत सलग आठ व्यवहारात सेन्सेक्स १,१३८.११ अंशाने घसरला आहे. बाजारात आज डॉलरच्या तुलनेत ६३च्याच खाली प्रवास करणाऱ्या रुपयाचाही दबाव जाणवला. गेल, सीप्ला, टीसीएस, आयटीसी, एचडीएफसी बँक, रिलायन्स, लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग घसरले. सेन्सेक्समधील १९ कंपनी समभागांचे मूल्य रोडावले. १.१४ टक्क्यांसह बांधकाम निर्देशांक मोठी घसरण नोंदविता झाला.
 नफा घसरूनही स्टेट बँकेचा समभाग उंचावला
ल्ल अनुत्पादक मालमत्तेपोटी (एनपीए) करावे लागणाऱ्या अतिरिक्त तरतुदीपोटी तिमाही निकालावर विपरीत परिणाम नोंदविणाऱ्या भारतीय स्टेट बँकेचा समभाग मात्र एकूण निर्देशांक नकारात्मक स्थितीत असतानादेखील दिवसअखेर १.३४ टक्के भाव खाऊन गेला. व्यवहारात ३ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदविणाऱ्या बँकेच्या समभागाचे मूल्य अखेर १,६९७ रुपयांवर स्थिरावले. बँकेने चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत विश्लेषकांच्या अपेक्षेप्रमाणे ३३ टक्क्यांची नफ्यातील घट नोंदविली आहे. गेल्या दोन वर्षांतील ही बँकेची सुमार तिमाही कामगिरी राहिली आहे. बँकेने सप्टेंबरअखेरची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता वर्षभरापूर्वीच्या ५.५१५ टक्क्यांवरून ५.६४ टक्क्यांवर गेले आहे.
 रुपयातील घसरण सावरली; मात्र अद्याप ६३ खाली
सलग पाच व्यवहारांत घसरणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी रिझव्र्ह बँकेने अनुसरलेला उपाय अखेर चलनाला बुधवारी तेजीत आणण्यास पूरक ठरला. सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून विदेशी चलनाची उपलब्धता मध्यवर्ती बँकेने करून दिल्याने रुपया ४१ पैशांनी वधारला. मात्र अद्यापही तो प्रति डॉलर ६३च्या खाली, ६३.३० वर आहे. गेल्या सलग पाच व्यवहारांत चलनाने ३.३९ टक्क्यांची घसरण नोंदविली आहे. बुधवारी व्यवहारात स्थानिक चलनाचा प्रवास ६३.९१ ते ६३.२८ असा चढा राहिला. चालू खात्यावरील तूट सरकारच्या ६० ते ७० अब्ज डॉलरपेक्षा कमी, ५६ अब्ज डॉलपर्यंत राहील, या रिझव्र्ह बँकेच्या आशेने चलन व्यवहारात उत्साह संचारला. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले रुपयाचे अवमूल्यन थोपविले गेले.