दमदार वाढीचा सलग सातवा आठवडा

गेल्या काही सलग सत्रांपासून कंपन्यांच्या तिमाही निकालावर स्वार असलेल्या भांडवली बाजाराची सप्ताहअखेर अनोख्या टप्प्यासह नव्या ऐतिहासिक विक्रमाने झाली. सलग तिसऱ्या सत्रात तेजी आणि उच्चांक नोंदविणारे प्रमुख निर्देशांक सप्ताह तुलनेतही सलग सातव्या आठवडय़ात झेपावणारे ठरले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी २५१.२९ अंश वाढीसह ३५,५११.५८ वर गेला. तर ७७.७० अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १०,८९४.७० पर्यंत स्थिरावला. सेन्सेक्स व्यवहारात ३५,५४२.१७ पर्यंत पोहोचला होता. तर आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात निफ्टी १०,९०० पर्यंत उंचावला होता.

सेन्सेक्स गेल्या सलग तीन व्यवहारांत मिळून ७४०.५३ अंशांनी उसळला आहे. चालू सप्ताहात मुंबई निर्देशांक ९१९.१९ अंश तर निफ्टी २१३.४५ अंशांनी वाढला आहे.

आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, टीसीएस, कोटक बँक, अ‍ॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, महिंद्र अँड महिंद्र, डॉ. रेड्डीज्, बजाज ऑटो, विप्रो, भारती एअरटेल, कोल इंडिया, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एशियन पेंट्स यांचाही क्रम सेन्सेक्समधील वाढणाऱ्या समभागांमध्ये राहिला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक निर्देशांक सर्वाधिक, १.५२ टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर स्थावर मालमत्ता, पायाभूत सेवा, सार्वजनिक उपक्रम, भांडवली वस्तू, पोलाद, तेल व वायू, ऊर्जा, आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान, वाहन निर्देशांक एक टक्क्यापर्यंत वाढले.

मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक पाऊण टक्क्यापर्यंत वाढले.

जीएसटी कर कपातीने नवीन ऊर्जा

’  भांडवली बाजारातील गेल्या सलग व्यवहारातील तेजीला शुक्रवारी वस्तू व सेवा कर प्रणालीतील बदल कारणीभूत ठरले. अनेक वस्तू तसेच सेवा आधीच्या तुलनेत कमी कर टप्प्यात आणले गेल्याचे स्वागत बाजाराच्या चालू आठवडय़ातील अखेरच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी केले. परिणामी दोन्ही निर्देशांकांनी त्यांचे गुरुवारचे विक्रम मोडीत काढण्यासह अनोख्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची कामगिरी बजावली.

’  आघाडीच्या कंपन्यांच्या लक्षणीय तिमाही निकालांनी बाजारातील उत्साह दुणावला. एचडीएफसी बँक, आयटीसी लिमिटेड, अदानी पोर्ट्स, येस बँक हे निकाल जाहीर करणारे समभाग मूल्यवाढीत अव्वल ठरले. भांडवली बाजारातील व्यवहार आटोपल्यानंतर वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग १.०९ टक्क्याने वाढला.