दिवसभरात ‘रोलर कोस्टर’वर स्वार असलेल्या भांडवली बाजारांनी मंगळवारअखेर नव्या विक्रमाची नोंद अखेर केलीच. सुरुवातीच्या वधारणेनंतर सलग चौथ्या व्यवहारांती सेन्सेक्ससह निफ्टी सर्वोच्च स्तरावर पोहोचला.
सोमवारच्या तुलनेत दोन्ही निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये १३.८३ अंश वाढ होऊन तो २४,३७६.८८ वर स्थिरावला; तर निफ्टीत ११.९५ अंश भर पडल्याने हा निर्देशांक ७,२७५.५० वर बंद झाला.
गेल्या चारही व्यवहारात विक्रमाच्या पुढे जाणाऱ्या मुंबई निर्देशांकात ५६१.७६ अंशांची भर पडली आहे. सेन्सेक्स दिवसभरात २४,५०० चा स्तर ओलांडता झाला. दिवसअखेर गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा मार्ग अवलंबला.
बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू, पोलाद, औषधनिर्मिती, तेल व वायू या क्षेत्रातील समभागांचे मूल्य उंचावले. त्याचबरोबर छोटय़ा गुंतवणूकदारांची पसंती असलेले स्मॉल व मिड कॅपही वधारले.
नरेंद्र मोदी सरकार स्थापनेकडे कालावधी सरकत असताना बाजारातही सावध तेजीची क्रिया घडत आहे. याच जोरावर सप्ताहारंभी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १,३५०.०४ कोटी रुपये भांडवली बाजारात ओतले.
मंगळवारी सेन्सेक्समधील रिलायन्स, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, एनटीपीसी, गेल इंडिया यांना मागणी राहिली.
सेन्सेक्समधील १७ समभाग तेजीत राहिले, तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बांधकाम निर्देशांक ४.८९ टक्क्यांनी आघाडीवर होता. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीचा सर्वाधिक फटका तेल व वायू क्षेत्रातील समभागांना बसला.

रुपया मात्र अडखळला
गेल्या चार व्यवहारात भक्कम होणारे स्थानिक चलन मंगळवारी किरकोळ पैशाच्या घसरणीने स्थिरावले. ४ पैशांच्या अवमूल्यनासह रुपया डॉलरच्या तुलनेत ५८.६३ पर्यंत खाली येताना त्याच्या गेल्या ११ महिन्यांच्या उच्चांकापासूनही ढळला. रुपयाचा आठवडय़ातील दुसऱ्या दिवसाचा प्रवास ५८.५१ ते ५८.७९ असा राहिला. १३ एप्रिलपासूनच्या चार सत्रातील १४६ पैसे वधारणेनंतर रुपयाने त्याच्या १७ जून २०१३ च्या ५७.८७ या उच्चांकापासूनही आता माघार घेतली आहे.