निर्देशांकांमध्ये नाममात्र बदल
सेन्सेक्समध्ये नगण्य घसरण आणि निफ्टीत नाममात्र वाढ अशी संमिश्र हालचालीची नोंद करणाऱ्या भांडवली बाजारात, मुंबई शेअर बाजाराने मात्र शुक्रवारी १०० लाख कोटी रुपयांच्या बाजार मूल्यास गवसणी घातली. मुंबई शेअर बाजारातील एकूण सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य शुक्रवारच्या व्यवहारात १००.३० लाख कोटी रुपयांवर पातळीवर गेले होते.
दुपारच्या व्यवहारात २६,९१६.२५ पर्यंत झेपावणाऱ्या मुंबई शेअर बाजारात सर्वात जुन्या भांडवली बाजाराला हा अनोखा टप्पा पुन्हा गाठता आला. मुंबई शेअर बाजाराने २८ नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रथमच हा स्तर अनुभवला होता. उलाढालीत जगातील पहिल्या १० मध्ये स्थान राखणाऱ्या मुंबई शेअर बाजारात तीन कोटी गुंतवणूकदार भाग घेतात.
सेन्सेक्सला २७ हजारांचा अडसर
सत्रात गाठलेले २७,००० आणि ८,२५० असे अनोखे राखू न शकलेले अनुक्रमे सेन्सेक्स व निफ्टी हे निर्देशांक शुक्रवारी दिवसअखेर नाममात्र फेरबदलासह स्थिरावले. मात्र आठवडय़ाच्या स्तरावर दोन्ही निर्देशांकांनी सलग दुसरी सप्ताह वाढ नोंदविली.
दिवसअखेर सेन्सेक्स कालच्या तुलनेत केवळ ०.११ अंश घसरणीसह २६,८४३.०३ पर्यंत तर १.८५ अंश वाढीसह निफ्टी ८,२२०.८० वर राहिला. किरकोळ घसरण नोंदवूनही सेन्सेक्सला २८ ऑक्टोबर २०१४ नंतरचा सर्वात वरचा टप्पा राखण्यात यश आले.
आठवडय़ातील शेवटच्या व्यवहाराची बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. दुपापर्यंत सेन्सेक्स २७ हजारावर जाताना त्याच्या सात महिन्यांच्या वरच्या टप्पावर विराजमान झाला. तर याच वेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२५० पर्यंत पोहोचला.
चालू सप्ताहात सेन्सेक्स १८९.४३ तर निफ्टी ६४.१५ अंशांनी वाढला आहे. प्रमुख निर्देशांकांची ही सलग दुसरी साप्ताहिक तेजी राहिली आहे. सेन्सेक्सने आधीच्या सलग दोन व्यवहारांत १७५.१८ अंश वाढ नोंदविली आहे.