जागतिक शेअर बाजारांची मात्र अर्ध-शतकातील
सर्वात चमकदार वार्षिक कामगिरी
मागील वर्षांरंभी कोणा विश्लेषकाने २०१३ हे वर्ष स्वप्नवत परतावा देणारे वर्ष ठरेल असे भविष्य वर्तविले असते तर त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. किंबहुना विश्लेषकाने अशा भाकिताचे धाडसही केले नाही. पण प्रत्यक्षात वर्ष २००८ पासूनच्या उच्चाकांवर बंद झालेला ‘‘मॉर्गन स्टॅन्ले कम्पोझिट इंडेक्स’ व त्यातील २८% अशी मागील ४० वर्षांतील सर्वाधिक वार्षिक वाढ ही जागतिक शेअर बाजारात सरलेल्या २०१३ सालाचे ठळक वैशिष्टय़च ठरले.
अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारण्याची शक्यता दृष्टीपथात नसल्याने फेडचे अध्यक्ष असलेल्या बेन बर्नान्के यांनी २०१५ पर्यंत व्याजदर स्थिर ठेवण्याची ग्वाही देण्याबरोबरच, सप्टेंबर २०१२ पासून दरमहा ८५ अब्ज डॉलर्सच्या प्रोत्साहनपर रोखे खरेदीच्या पाश्र्वभूमीवर २०१३ सालाची सुरवात झाली होती. आता प्रत्यक्षात जानेवारी २०१४ पासून प्रोत्साहनपर रोखे खरेदीत १० अब्ज डॉलर्सची कपात करण्याची पाळी फेडवर आली आहे. तथापि अमेरिका अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे प्रतििबब जागतिक शेअर बाजारांच्या निर्देशांकावर दिसून आले. जागतिक शेअर बाजारांचा निर्देशांक समजल्या जाणाऱ्या ‘मॉर्गन स्टॅन्ले कम्पोझिट इंडेक्स’ हा निर्देशांक सहा वर्षांच्या उच्चांकावर बंद होतानाच त्याने वार्षकि २८% वाढ दर्शविली.
अमेरिकेच्या एस अँड पी ५०० या निर्देशांकाने ३०%, जर्मनीच्या डॅक्सने ३१%  लंडनच्या फुट्सीने १२% व फ्रेंच कॅक-४० ने १५% वार्षिक वाढ दर्शविली. मागील वर्ष संपतांच इटली व ग्रीस या युरोपमधील अर्थव्यवस्था डळमळीत झाल्या होत्या. या अर्थव्यवस्थांवर कडक आíथक धोरणे अवलंबून कठोर वित्तीय शिस्तीचे पालन करण्यास युरोपच्या मध्यवर्ती बँकेने भाग पाडले. त्यासाठी जर्मनी व फ्रान्स यांनी त्यांची कर्जे काही प्रमाणात माफ करण्याची तयारी दाखविली आणि त्यायोगे युरोपियन महासंघात फुटीला टाळले. याचा परिणाम जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकांत एंजेला मर्केल जर्मनीच्या चॅन्सलर म्हणून पुन्हा निवडल्या गेल्या.
जागतिक भांडवली बाजारात सर्वात चमकदार कामगिरी दिसून आली ती आशियातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या जपानकडून. १९७२ पासूनचा एका वर्षांतील सर्वाधिक ५७%चा परतावा ‘निक्केई २२५’ या निर्देशांकाने दिला. या वर्षांतील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी निर्देशांक १६,२९१.३१ वर अर्थात ०.६९ टक्के वर बंद होतानाच, १९७२ पासूनची एका वर्षांतील सर्वाधिक वाढ त्याने दर्शविली. जपानमधील मोठ्या शंभर कंपन्यांच्या किमतींवर आधारीत ‘टोक्यो स्टॉक एक्स्चेंज इंडेक्स’ अर्थात ‘टोपिक्स’ शेवटच्या दिवशी ०.९५% ची उसळी घेत १३०२.२९ वर बंद झाला या निर्देशांकाने या वर्षांत ५२% कमाई केली असून, वार्षिक ५०% हून अधिक वाढ त्यात मागील १०० वर्षांत फक्त दोनदा दिसून आली आहे.

गुंतवणूकदारांची माया
१.१० लाख कोटींनी वधारली!
मुंबई : २०१४ च्या शेवटच्या महिन्यातच ऐतिहासिक उच्चांकाची नोंद करणाऱ्या प्रमुख भांडवली बाजाराने वर्षांचा निरोपही वाढीसह घेतला. ९ डिसेंबरला २१,४८३.७४ अशा सर्वोच्च स्थानावर पोहोचलेला सेन्सेक्स ३१ डिसेंबर रोजी २७.६७ अंश वाढीने २१,१७०.६८ वर बंद झाला. राष्ष्ट्रीय शेअर बाजारानेही १२.९० अंश वाढ नोंदवित वर्षअखेर ६,३०४.०० हा स्तर गाठला. याच वर्षांत सहा वर्षांनंतर सेन्सेक्स २१ हजारापुढे गेला होता.
२०१४ च्या अखरेच्या डिसेंबर या महिन्याच्या सुरुवातीला सेन्सेक्स सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला होता. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या बहुमताच्या जोरावरील सेन्सेक्सचा २१ हजारापुढील प्रवास वर्षअखेरही कायम राहिला. वर्षभरापूर्वी तब्बल २६ टक्क्यांनी उंचावणारा सेन्सेक्स २०१४ मध्ये मात्र अवघ्या ८.९८ टक्क्यांनी वधारला. वर्षभरात विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ मात्र ३.९० अब्ज डॉलरने रोडावला.

निर्देशांकाचा वार्षिक प्रवास
सेन्सेक्स : +१,७४३.९७ अंश   ८.९८%
सर्वोच्च     : २१,४८३.७४      (९ डिसेंबर)
विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी : २०.१ अब्ज डॉलर                   ३.९० अब्ज डॉलर
गुंतवणूकदारांची मालमत्ता :     ७०.३२ लाख कोटी                        ” १.१० लाख कोटी

भारतीयांनाही लाभ शक्य..
भारतीय रुपया पूर्ण परिवर्तनीय नसला व गुंतवणूकदारांना जरी प्रत्यक्ष विदेशी शेअर बाजारातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊ शकत नसले तरी, म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून जागतिक तेजीचा फायदा भारतीय गुंतवणूकदार उठवू शकतात. अमेरिका, युरोप, आशियातील कंपन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या अनेक योजना भारतीयांसाठी खुल्या आहेत. या योजनांनी मागील एका वर्षांत ५०% हून अधिक परतावा गुंतवणूकदारांना दिला असल्याचे गुंतवणूक विश्लेषक मििलद अन्धृटकर यांनी सांगितले.

जागतिक निर्देशांकांची २०१३ मधील कमाई
डाऊ जोन्स (अमेरिका)    २५.९५%
नॅसडॅक (अमेरिका)        ३७.५८%
एस अ‍ॅण्ड पी ५०० (अमेरिका)    ३१.२८%
डॅक्स (जर्मनी)        ३१.२८%
कॅक-४० (फ्रान्स)        १४.५१%
फुट्सी (लंडन)        ११.६८%
निक्केई (जपान)        ५२.४२%
शांघाय (चीन)        -६.७६%
जकार्ता (इंडोनेशिया)        १.०७%
बोव्हेस्पा (ब्राझील)               -१५.५०%
आरटीएस (रशिया)        -१.१८%