02 June 2020

News Flash

सलग सहाव्या गटांगळीने सेन्सेक्स २५ हजाराच्या वेशीवर

सलग सहाव्या सत्रातील घसरणीमुळे सेन्सेक्स बुधवारी २५ हजारांवर येऊन ठेपला

सेन्सेक्स

सलग सहाव्या सत्रातील घसरणीमुळे सेन्सेक्स बुधवारी २५ हजारांवर येऊन ठेपला. २७४.२८ अंश आपटीने मुंबई निर्देशांक दिवसअखेर २५,०३६.०५ वर स्थिरावला. तर ८९.२० अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,६१२.५० पर्यंत खाली आला आहे.
रेंगाळलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाबाबतची चिंता पुन्हा बाजारात उमटली. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातील निधी काढून घेत दोन्ही प्रमुख निर्देशांकाला प्रत्येकी एक टक्क्याहून अधिक घसरण नोंदविण्यास भाग पाडले.
सलग पाच व्यवहारातील घसरण नोंदविणारा सेन्सेक्स बुधवारी सकाळच्या व्यवहारातही ८० हून अधिक अंशांनी खाली होता. तर निफ्टीने मात्र सत्र सुरुवातीलाच त्याचा ७,७०० चा स्तर सोडला होता. व्यवहारात सेन्सेक्स २५,०१२.२२ पर्यंत खाली आला होता.
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या संभाव्य व्याज दर वाढीचे सावटही बाजारात उमटले. मात्र विरोधी पक्षाच्या सरकारच्या असहकार भूमिकेमुळे वस्तू व सेवा कर विधेयक सादर होत नसल्याचा परिणाम अधिक जाणवला. त्यामुळे गेल्या पाच व्यवहारापासून होत असलेली निर्देशांकांची घसरण गुरुवारी अधिकच विस्तारली.
२५ हजारांच्या काठावर आलेल्या सेन्सेक्सने त्याचा ७ सप्टेंबरनंतरचा तळ नोंदविला. बुधवारच्या सत्रात निर्देशांक २५,३१६.९५ ते २५,०१२.२२ दरम्यान राहिला. व्यवहारअखेरही सेन्सेक्सने २५ हजाराचा स्तर सोडला नसला तरी निफ्टीने मात्र ७,७०० ची पातळी सोडली. सेन्सेक्समधील केवळ पाच समभागांचे मूल्य वाढले.
पोलाद क्षेत्रात वेदांता, टाटा स्टील, हिंदाल्को यांचे मूल्य ५.५० टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर क्षेत्रीय निर्देशांक सर्वाधिक ३.०७ टक्क्यांनी घसरला. अन्य क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा, तेल व वायू, वाहन तसेच स्थावर मालमत्ता यांचे मूल्य रोडावले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे २.२४ व १.७६ टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्सची गेल्या सहा व्यवहारातील मिळून घसरण आता १,१३३.३६ अंश झाली आहे.

टांगणीला लागलेल्या ‘जीएसटी’ विधेयकाचा फटका
वस्तू व सेवा कर विधेयक पारित होण्यातील दिरंगाईमुळे मुंबई शेअर बाजारात माल वाहतूक क्षेत्रात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे समभाग बुधवारी तब्बल १६ टक्क्यांपर्यंत आपटले.
पटेल इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स रु. १११.९० (-१६.३१%)
गती रु. १५२.२५ (-७.९५%)
ऑलकार्गो रु. ३५०.९० (-५.१२%)
स्नोमॅन लॉजिस्टिक्स रु. ८४.७० (-३.५९%)
सिकल लॉजिस्टिक्स रु. १३०.०० (-२.९९%)
व्हीआरएल लॉजिस्टिक्स रु. ४०८. ५५ (-२.४४%)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2015 2:35 am

Web Title: sensex fall down
टॅग Bse,Sensex
Next Stories
1 पेमेंट बँकांबाबत बागुलबुवा नको!
2 भांडवली बाजारातील गुंतवणुकीची कुठलेच सरकार हमी देणार नाही
3 आठ महिन्यांत नवीन २७ लाख गुंतवणूकदारांची भर
Just Now!
X