अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेड रिझव्‍‌र्हच्या धरसोडपणामुळे जगातील सर्वच बाजारात झालेल्या पडझडीचे प्रतिबिंब स्थानिक भांडवली बाजारातही गुरुवारी उमटले. सेन्सेक्स तब्बल ३२४ अंशांच्या मोठय़ा गटांगळीसह २७,६०७.८२ या पातळीवर स्थिरावले.

‘फेड’च्या जुलैमध्ये झालेल्या बैठकीसंबंधी गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या नोंदीत, अमेरिकेची अर्थव्यवस्था व्याजाचे दर उंचावले जावेत अशा उत्कर्षबिंदूला अद्याप पोहोचली नसल्याबाबत दिसलेले व्यापक एकमत जगभरातील भांडवली बाजाराचा मूड पालटविणारे ठरले. यामुळे अपेक्षित असलेली व्याजदरातील वाढ आणखी लांबणीवर पडेल, हे अनेक गुंतवणूकदारांसाठी निराशादायी ठरले.
या घटनेचे पडसाद म्हणून, गुंतवणूकदारांचा होरा पुन्हा सोन्यातील ‘सुरक्षितते’कडे वळलेला दिसला आणि सोन्याचे भाव उसळताना आढळून आले. त्या उलट अन्य जिन्नस, धातू आणि खनिज तेल (ब्रेन्ट क्रूड) यांचे भाव सपाटून गडगडले.
स्थानिक बाजारात, सेन्सेक्समधील १.१६ टक्क्य़ांच्या घसरणीपेक्षा जास्त निफ्टीमधील गटांगळी जास्त म्हणजे १२२.४० अंश (१.४४ टक्के) अशी राहिली. गेल्या महिन्यांतील (२७ जुलैनंतरची) ही निफ्टी निर्देशांकातील सर्वात मोठी घसरण आहे. उल्लेखनीय म्हणजे निफ्टीने तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाची आधारपातळी असलेल्या ८,४००ची वेसही या पडझडीतून ओलांडली आणि हा निर्देशांक ८,३७२.७५ वर स्थिरावला.
मुंबईच्या सराफ बाजारात सोन्याने दीड महिन्यांपूर्वी म्हणजे ३० जूनपूर्वीची भाव पातळी कमावणारी झळाळी मिळविली. आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषत: युरोपातील प्रारंभिक व्यवहारात सोने पाच आठवडय़ांच्या पातळीवर झेपावल्याचे दिसून आले. अर्थात देशात सणोत्सवाच्या हंगामाच्या तोंडावर सोने पुन्हा भाव कमावताना दिसून येत आहे.
मंगळवारी मुंबईत घाऊक सराफा व्यवहारात स्टँडर्ड सोन्याने (९९.५ टक्के शुद्धता) प्रति १० ग्रॅम ४६५ रुपयांनी उसळी घेतली आणि दिवसअखेर भाव २६,३५० रुपयांवर जाऊन पोहोचला. ३० जून २०१५ नंतरच्या दीड महिन्यातील स्टँडर्ड सोन्याचा हा सर्वोच्च भाव आहे. शुद्ध चांदीही किलोमागे १,१६५ रुपयांनी वाढून ३६,७९५ रुपयांवर गेली.