News Flash

निर्देशांक उभारी अल्पायुषी

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी जवळपास एक टक्क्यापर्यंत घसरले.

बाजाराला पुन्हा मंदीच्या चिंतेचे ग्रहण

मुंबई : आर्थिक मंदी थोपविण्यासाठी सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपाययोजनांवर सुरू असलेला भांडवली बाजाराच्या उभारीचा प्रवास बुधवारी मात्र थंडावला आणि पुन्हा मंदीच्या चिंतेने बाजाराला घेरलेले दिसून आले. अर्थव्यवस्थेच्या धास्तीने गडगडलेल्या जागतिक भांडवली बाजाराबरोबरच, स्थानिक स्तरावर गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्रात घसरण नोंदविली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८९.४३ अंश घसरणीसह ३७,४५१.८४ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ५९.२५ अंश घसरणीने ११,०४६.१० पर्यंत स्थिरावला. सरकारकडून घोषित अर्थप्रोत्साहक निर्णयांच्या पाश्र्वभूमीवर सेन्सेक्सने मागील तीन दिवसांत १,१६८.३४ अंशांची उसळी दर्शविली होती.

बुधवारच्या व्यवहारांवर मंदीवाल्यांचे सुस्पष्ट वर्चस्व दिसून आले. परिणामी खरेदीदारांपेक्षा, नफावसुलीच्या उद्देशाने विक्री करणाऱ्यांचे पारडे जड दिसून आले. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारात १,१०८ समभाग घसरण दर्शविणारे तर ६७४ समभागांच्या मूल्यात वाढ दिसून आली.

सेन्सेक्समध्ये वेदांता, टाटा स्टील, टाटा मोटर्स, ओएनजीसी, महिंद्र अँड महिंद्र, मारुती सुझुकी, एनटीपीसी, हिंदुस्थान यूनिलिव्हर हे प्रमुख समभाग ४ टक्क्यांपर्यंत आपटले. याउलट एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्र, एचडीएफसी, टीसीएस, एशियन पेंट्सचे मूल्य वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, ऊर्जा, बँक, वाहन क्षेत्रावर दबाव राहिला. हे निर्देशांक ३.४० टक्क्यांपर्यंत घसरले. तर स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक दोन टक्क्यापर्यंत वाढले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी जवळपास एक टक्क्यापर्यंत घसरले.

येस बँक समभागाची घसरगुंडी सुरूच..

खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या समभागात बुधवारच्या व्यवहारात ७.४७ टक्के उतार दिसला. अमेरिकी वित्तसंस्था मूडीजने बँकेमार्फत जारी केले जाणाऱ्या विदेशी चलनाचे पतमानांकन ‘बीए१’वरून ‘बीए३’पर्यंत खाली आणल्याचा विपरीत परिणाम बँकेच्या बाजार भांडवलावरही झाला. व्यवहारअखेर ५९.५० रुपये मूल्य राखल्यानंतर बीएसईवर येस बँकेचे बाजार भांडवल १,२२३.६६ कोटी रुपयांनी रोडावून १५,१७४.३४ कोटी रुपयांवर येऊन ठेपले. मंगळवारच्या तुलनेत बँकेचा समभाग तब्बल ९.७२ टक्क्यांनी आपटला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2019 3:05 am

Web Title: sensex falls 189 points nifty below 11050 zws 70
Next Stories
1 गुंतवणूकदार ४.८ लाख कोटींनी श्रीमंत
2 गुंतवणूकदार संख्या १० कोटींवर; एकूण मालमत्ता १०० लाख कोटींची
3 रिझव्‍‌र्ह बँकेकडून सरकारला अखेर १.७६ लाख कोटी
Just Now!
X