सप्ताहअखेर सेन्सेक्ससह निफ्टीची निर्देशांक घसरण

मुंबई : स्थिर व्याजदरासह अर्थव्यवस्था व महागाईबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केलेली चिंता भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये सलग दुसऱ्या सत्रातही कायम राहिली. सप्ताहअखेर समभाग विक्रीचा मारा अधिक प्रमाणात करताना गुंतवणूकदारांनी प्रमुख निर्देशांकांना त्यांच्या अनोख्या टप्प्यापासून आणखी दूर नेले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात गुरुवारच्या तुलनेत तब्बल ३३४.४४ अंशांच्या आपटीसह ४०,४४५.१५ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी व्यवहारअखेर ९६.९० अंश घसरणीसह १२ हजारांच्या खाली, ११,९२१.५० पर्यंत येऊन थांबला.

चालू आर्थिक वर्षांतील पाचव्या द्विमासिक पतधोरणात रेपो आदी व्याजदर कमी करण्याच्या निर्णयाबद्दल भांडवली बाजाराने गुरुवारी किरकोळ घसरणीसह नाराजी व्यक्त केली होती. हाच कित्ता दोन्ही प्रमुख भांडवली बाजारात शुक्रवारीही गिरविला. दुपारच्या सत्रापूर्वीच मुंबई निर्देशांकाने ४०,५०० चा स्तर सोडला होता.

सप्ताह तुलनेत सेन्सेक्स ३४८.६६ अंशांनी तर निफ्टी १३४.५५ अंशांनी खाली आला आहे. व्याजदराशी निगडित क्षेत्रांसह तेल व वायू क्षेत्रीय निर्देशांकातील घसरण शुक्रवारी लक्षणीय ठरली. प्रमुख तेल उत्पादक देशांच्या येत्या काही दिवसांत होणाऱ्या बैठकीत इंधन उत्पादनाच्या संभाव्य कपातीबाबतचा हा परिणाम होता.

मूडीज या गुंतवणूकदार सेवा, पतमानांकन कंपनीने येस बँकेचे मानांकन कमी केल्यानंतर खासगी बँकेचा समभाग तब्बल १० टक्क्यांपर्यंतच्या घसरणीसह सेन्सेक्समध्येही आघाडीवर राहिला. तर कंपनीच्या अध्यक्षांनी व्यवसाय बंद करण्याच्या दिलेल्या इशाऱ्याने भांडवली बाजारात सूचिबद्ध व्होडाफोन आयडियाचे समभाग मूल्य ९ टक्क्यांपर्यंत आपटले.

मुंबई निर्देशांकातील ३० पैकी २३ समभाग घसरणीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन निर्देशांकाला अधिक, १.८० टक्केपर्यंत घसरण फटका बसला.