01 November 2020

News Flash

तेलभडक्याची चिंता

‘सेन्सेक्स’ची ६४२ अंशांनी आपटी ‘निफ्टी’ ११ हजाराच्याही खाली!

(संग्रहित छायाचित्र)

सौदी अरेबियातील दोन खनिज तेल प्रकल्पावरील ड्रोन हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात उसळलेल्या खनिज तेलाच्या किंमतीची चिंता मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजाराच्या व्यवहारात उमटली.

मुंबई निर्देशांक- ‘सेन्सेक्स’मध्ये तब्बल ६४२.२२ अंशांची आपटी नोंदली गेली. परिणामी दिवसअखेर हा निर्देशांक ३६,५०० च्याही खाली, ३६,४८१.०९ वर येऊन ठेपला. तर १८५.९० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’ निर्देशांकाने ११ हजाराचा स्तर सोडत १०,८१७.६९ ची पातळी गाठली.

सोमवारच्या जवळपास २६३ अंश आपटीची भर जमेस धरून मुंबई निर्देशांकाने गेल्या दोन दिवसांत एकूण ७०४.२२ अंश घसरण नोंदविली आहे. सौदीतील घडामोडीमुळे नजीकच्या कालावधीत इंधन तुटवडा होण्यासह, पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची चिंतेने भांडवली बाजारात गुंतवणूकदारांकडून समभागांच्या विक्रीचा मारा झाला.

येथील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत आणखी घसरलेल्या रुपयाचेही सावटही बाजारातील व्यवहारादरम्यान उमटले.

सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन, एमएमटीसी, प्रोजेक्ट अ‍ॅण्ड इक्विपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या विलीनीकरण अथवा या कंपन्या बंद करून मोडीत काढण्याच्या केंद्र सरकारच्या संकेतानेही बाजारात समभाग घसरण नोंदली गेली. तर केकेआर इंडियाच्या १० टक्के समभाग खरेदीमुळे सीजी पॉवर अँड इंडस्ट्रिअल सोल्युशन्सच्या समभागाचे मूल्य मात्र ५ टक्क्याने उंचावले.

सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ तीन समभागांचे मूल्य वाढते राहिले. त्यात हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, इन्फोसिसचा क्रम राहिला. तर हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, मारुती सुझुकी, स्टेट बँक यांचे मूल्य ६ टक्क्यांपर्यंत घसरले.

मुंबई शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रीय निर्देशांक जवळपास ४ टक्क्यांपर्यंत आपटले. त्यातही वाहन, स्थावर मालमत्ता, पोलाद, बँक, वित्त, तेल व वायू, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान अधिक नुकसान नोंदविणारे ठरले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅपमध्येही दोन टक्क्यांपर्यंतची घसरण झाली.

गुंतवणूकदारांना २.७२ लाख कोटींचा फटका

सलग दोन दिवसांतील ‘सेन्सेक्स’च्या ७०० हून अधिक अंशांच्या गटांगळीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे २.७२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्याचे बाजारमूल्य मंगळवारअखेर १३८.७० लाख कोटी रुपयांवर आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 1:18 am

Web Title: sensex falls 666 59 points nifty below 11 thousand abn 97
Next Stories
1 ‘पारले’कडून अखेर ८ ते १० टक्के उत्पादनकपात
2 नोकरदार वर्गासाठी खुशखबर… पीएफच्या व्याजदरात वाढ
3 इंधन दरवाढीचा भडका!
Just Now!
X