ट्रम्प धास्तीने विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय..

सप्ताहाची अखेर करताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी २७,०००च्याही खाली गेला. भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने मुंबई निर्देशांक आता गेल्या चार महिन्यांतील तळात विसावला आहे.

एकाच व्यवहारात शुक्रवारअखेर सेन्सेक्सने गुरुवारच्या तुलनेत ६९८.८६ अंशांची आपटी नोंदवली. सेन्सेक्सचा हा ११ फेब्रुवारी रोजीच्या ८०७.०७ अंश घसरणीनंतरचा किमान स्तर होता. दिवसअखेर तो २६,८१८.८२ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२९.४५ अंश आपटीसह ८,२९६.३० वर स्थिरावला.

दिवसअखेरचा सेन्सेक्सचा तळ हा २९ जूननंतरचा आहे. साप्ताहिक तुलनेत यंदाच्या आठवडय़ात मुंबई निर्देशांक ४५५.३३ अंशांनी तर निफ्टी १३७.४५ अंशांनी खाली आला आहे. शुक्रवारी सेन्सेक्समधील केवळ सन फार्मा (+३.३०%) वगळता इतर सर्व २९ समभाग घसरणीच्या यादीत राहिले.

मंगळवारच्या सत्रातील हडकंपानंतर गेल्या सलग दोन व्यवहारांत सेन्सेक्सने तेजी नोंदविली होती. नफेखोरीपोटी शुक्रवारचे व्यवहारच ४०० हून अधिक अंशांनी घसरला होता. तर निफ्टीने ८,४०० चा स्तरही या वेळी सोडला होता. सत्रात सेन्सेक्स २६७७७.१८ पर्यंत तर निफ्टी ८,२९६.३० पर्यंत आपटला. निफ्टीचाही दिवसअखेरचा प्रवास हा ३० जूननंतरनंतरचा किमान ठरला.

जागतिक भांडवली बाजारातील घसरण आणि भारतात परकी चलन मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाची ६७ पैशांच्या तळाला घातलेली फेराही मुंबई शेअर बाजारातील मोठय़ा घसरणीला कारणीभूत ठरला. सायंकाळी जाहीर होणाऱ्या सप्टेंबरमधील औद्योगिक उत्पादनाच्या वाढत्या दराबाबतही गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेरचे व्यवहार करताना शंका नोंदविली.

अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प हे त्यांची धोरणे अमलात आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर सरकारी खर्च करण्याची शक्यता धरून याचा दबाव देशाच्या महागाईवर होण्याबाबतची भीती गुंतवणूकदारांनी व्यक्त केली. परिणामी आशियासह युरोपातील भांडवली बाजारात एक टक्क्यांहून अधिकपर्यंतची घसरण नोंदली गेली.

सेन्सेक्समधील घसरलेल्या समभागांमध्ये महिंद्र अँड महिंद्र, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स, एचडीएफसी लिमिटेड, गेल, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, पॉवर ग्रिड, टीसीएस यांचे समभाग मूल्य तब्बल ६ टक्क्यांपर्यंत रोडावले. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील नफ्यातील २०.७० टक्के नफा घसरण नोंदविणाऱ्या स्टेट बँकेचे समभाग मूल्य तान टक्क्यांपर्यंत आपटले.